Kalyan Jail Bribe Case : कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात 'भेट' पडली महागात! कैद्याला भेटण्यासाठी लाच घेताना दोन हवालदार रंगेहाथ अटकेत; एसीबीचा मोठा दणका
Kalyan Jail Latest Bribe Case : भेटीसाठी 1500 रुपयांची मागणी; पदपथावर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले | खडकपाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा खटला
1 મિનિટ વાંચન

Kalyan Jail Latest Bribe Case : भेटीसाठी 1500 रुपयांची मागणी; पदपथावर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले | खडकपाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा खटला
कल्याण (ठाणे) :- कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील स्वागत कक्षात बसून कैद्यांच्या नातेवाईकांची आणि मित्रांची लूट करणाऱ्या दोन पोलीस हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी सापळा रचून अटक केली. सतीश तानाजी भोसले (55 वय) आणि शरद नाना पानपाटील (39 वय) अशी अटक करण्यात आलेल्या भ्रष्ट हवालदारांची नावे आहेत. या कारवाईमुळे तुरुंग प्रशासनातील सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
नेमके प्रकरण काय?
आधारवाडी तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विकास पगारे या कैद्याला भेटण्यासाठी त्याचा एक मित्र गेल्या आठवड्यात तुरुंगात आला होता. स्वागत कक्षात ड्युटीवर असलेल्या भोसले आणि पानपाटील यांनी त्याला अडवले. "तुम्ही विकासचे नातेवाईक नाही, त्यामुळे तुम्हाला भेटता येणार नाही," असा बनाव त्यांनी रचला. जर भेटायचे असेल, तर एक हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी या हवालदारांनी केली.
तडजोड आणि एसीबीचा सापळा
तक्रारदाराने या भ्रष्टाचाराला बळी न पडण्याचे ठरवले आणि थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान हवालदारांनी लाचेच्या रकमेत वाढ करत प्रत्येकी 500 आणि एका महिला कर्मचाऱ्यासाठी 500 अशी एकूण 1500 रुपयांची मागणी केली.
सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास, तक्रारदार पैसे देण्यासाठी तुरुंगाबाहेरील पदपथावर पोहोचला. तिथे शरद पानपाटील याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहाथ पकडले. याच वेळी त्याचे साथीदार सतीश भोसले यांनाही ताब्यात घेण्यात आले.
खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन खडकपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आधारवाडी तुरुंगात कैद्यांना भेटण्यासाठी अशा प्रकारे पैशांची मागणी होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत, मात्र या कारवाईमुळे अशा प्रवृत्तींना मोठा चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
