Jagdeep Dhankhar : "ईडीचा धाक दाखवून जगदीप धनखड यांचा राजीनामा!"; संजय राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकातून खळबळजनक दावे
Sanjay Raut On Jagdeep Dhankhar : राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सोमवारी प्रकाशन; अशोक लवासा प्रकरणासह 4 नवीन प्रकरणांचा पुस्तकात समावेश
2 મિનિટ વાંચન

Sanjay Raut On Jagdeep Dhankhar : राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सोमवारी प्रकाशन; अशोक लवासा प्रकरणासह 4 नवीन प्रकरणांचा पुस्तकात समावेश
मुंबई :- पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात 100 दिवस आर्थर रोड कारागृहाची वारी करून आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी लिहिलेले 'नरकातील स्वर्ग' हे पुस्तक सध्या राजकीय वर्तुळात वादळाचे केंद्र ठरत आहे. या पुस्तकाच्या आगामी हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीमध्ये राऊत यांनी काही नवीन प्रकरणे जोडली असून, त्यात माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबाबत केलेले खुलासे धक्कादायक आहेत. तपासी यंत्रणांचा वापर करून घटनात्मक पदांवरील व्यक्तींना कसे वाकवले जाते, याचे दाहक चित्रण राऊत यांनी या पुस्तकातून मांडले आहे.
संजय राऊत यांनी पुस्तकात दावा केला आहे की, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकारविरोधात काही हालचाली होत असल्याची माहिती सरकारला मिळाली होती. याचा सुगावा लागताच सरकारकडून त्यांचा राजीनामा मागण्यात आला, परंतु धनखड यांनी सुरुवातीला त्यास ठाम नकार दिला. त्यानंतर सरकारने जयपूरमधील त्यांच्या एका घराच्या व्यवहाराची आणि त्यातील पैसा परदेशात पाठवल्याची माहिती उकरून काढली. ईडीने यासंदर्भात एक फाईल तयार करून ती थेट धनखड यांच्यासमोर ठेवली आणि याच दबावापोटी त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.
केवळ उपराष्ट्रपतीच नव्हे, तर माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या कुटुंबालाही ईडीचा धाक दाखवून कशा प्रकारे विळख्यात ओढले गेले, याचेही सविस्तर वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच जगदीप धनखड यांची भेट घेतली होती, त्यानंतर पुस्तकातून बाहेर आलेली ही माहिती राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी ठरत आहे.
या बहुचर्चित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या सोमवारी, 23 मार्च रोजी मुंबईत पार पडणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, हा पुस्तक प्रकाशन सोहळा विरोधकांच्या एकजुटीचे मोठे शक्तिप्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे. या पुस्तकातील दाव्यांमुळे आता केंद्र सरकार आणि भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
