भवानी पेठ पालखी मुक्काम स्थळाच्या सोयी-सुविधांची पाहणी
भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश
1 મિનિટ વાંચન

भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश
निलेश राऊत
पुणे: भवानी पेठ येथील पालखी मुक्काम स्थळाची सोमवारी प्रशासकीय पातळीवर सविस्तर पाहणी करण्यात आली. आषाढी वारी दरम्यान पुण्यात विसावणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या समवेत आमदार हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काकडे, मंदिराचे विश्वस्त गोरख भिकुले, प्रमोद भेंगरूट, भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष धनंजय बडदे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
यावेळी मुक्काम स्थळी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था राहील याची खात्री करण्यात आली. तसेच फिरत्या शौचालयांसाठी नियोजित जागांची पाहणी करून स्वच्छता व सुशोभीकरणाबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. याचबरोबर पालखी मार्गावरील तसेच मुक्काम स्थळ परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व डागडुजी करून प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ करण्याचे निर्देश देण्यात आले.
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा
रस्त्यात अडथळा निर्माण करणारे दिव्यांचे खांब त्वरित हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश देण्यात आले. वारी कालावधीत २४ तास कार्यरत राहणाऱ्या आरोग्य पथकांसाठी योग्य जागेची निश्चिती करण्यात आली असून आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
