'नीट’ पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट भारतीय लष्कर मैदानात!
२१ जूनच्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वायुदलाच्या विमानांनी पोहोचवणार परीक्षा पेपर
2 મિનિટ વાંચન

२१ जूनच्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वायुदलाच्या विमानांनी पोहोचवणार परीक्षा पेपर
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेत नुकत्याच झालेल्या महाघोटाळ्यामुळे आणि पेपरफुटीच्या प्रकारांमुळे निर्माण झालेला जनक्षोभ शांत करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.आगामी २१ जून रोजी होणारी नीटची फेरपरीक्षा पूर्णपणे पारदर्शक, अत्यंत सुरक्षित आणि कोणत्याही गैरप्रकारांशिवाय पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने थेट भारतीय लष्कराची मदत घेण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, तर देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर गोपनीय परीक्षा पेपर्स अत्यंत सुरक्षितपणे आणि गोपनीयतेने पोहोचवण्यासाठी भारतीय वायुदलाच्या विमानांची मदत घेतली जाणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका वृत्तवाहिनीशी विशेष संवाद साधताना या संदर्भातील माहिती दिली असून, यामुळे नीट परीक्षेला आता देशाच्या लष्कराचे अभेद्य सुरक्षा कवच लाभणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भातील नियोजनासाठी राजधानी दिल्लीमध्ये देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची आणि उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, 'एनटीए’चे (NTA) नवनियुक्त महासंचालक अभिषेक सिंह, 'सीबीएसई’चे (CBSE) वरिष्ठ अधिकारी आणि थेट पंतप्रधान कार्यालयातील (PMO) सर्वोच्च अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत २१ जूनच्या फेरपरीक्षेच्या सुरक्षा आराखड्यावर अत्यंत सखोल मंथन करण्यात आले. परीक्षेची विश्वासार्हता आणि देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांचा डळमळीत झालेला विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ‘फुलप्रूफ’करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. त्यासाठी संवेदनशील परीक्षा केंद्रांवर लष्कराचे जवान प्रत्यक्ष बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार असून, तांत्रिक आणि मानवी सुरक्षा यंत्रणेचे नवे जाळे उभारले जात आहे.
दुसरीकडे, देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रकरणाला आता मोठ्या आर्थिक व्यवहारांची (Money Laundering) बाजू जोडली गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिवराज मोटेगांवकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित बँक खाती आणि बँक लॉकर्सची पडताळणी सीबीआयच्या विशेष पथकाकडून सुरू करण्यात आली आहे. मोटेगांवकरच्या बँक लॉकर्सची कसून झाडाझडती घेण्यात येत असून, यामध्ये मोठी रोख रक्कम, बेकायदेशीर बेनामी मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद बँक व्यवहारांचे पुरावे सापडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय पेपरफुटी रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यात सीबीआयला मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत.
सीबीआयचा थेट प्रहार - संशयित आरोपीचे बँक लॉकर्स स्कॅनरवर :
आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी : मुख्य आरोपी शिवराज मोटेगांवकरच्या बँक लॉकर्समधून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचे डिजिटल पुरावे आणि संशयास्पद बँक खात्यांचे दस्तावेज सीबीआयच्या हाती लागले आहेत.
बेनामी संपत्तीचा शोध : पेपरफुटीतून कमावलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये किंवा बेनामी मालमत्तेत गुंतवण्यात आला आहे का, हे पाहण्यासाठी सीबीआयचे पथक आरोपीच्या नातेवाइकांच्या खात्यांचीही बारकाईने तपासणी करत आहे.
