Hinjewadi : रु.२४ लाखांहून अधिक किमतीचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
वपोनि बालाजी पांढरे यांच्या नेत्तृत्वाखाली हिंजवडी तपास पथकाची कारवाई
2 મિનિટ વાંચન

वपोनि बालाजी पांढरे यांच्या नेत्तृत्वाखाली हिंजवडी तपास पथकाची कारवाई
पुणे, 3 एप्रिल (Maharashtra Mirror) :
दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत २४.५५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करून दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाकडून ३.२४ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. एका संशयिताला पुण्यातील हिंजवडी येथून, तर त्याच्या साथीदाराला मुंबईतील गोवंडी येथून ताब्यात घेण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे शोध पथक अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करत असताना ही यशप्राप्ती झाली.

अशी झाली कारवाई
सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सोमनाथ पांचाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) नरेश बलसाने, पोलीस कर्मचारी कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे आणि अरुण पारधी यांचे पथक हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी बलसाने यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती कारमधून मेफेड्रोन (MD) घेऊन वाकडमधील विनोदे वस्ती येथे येणार आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर, पथकाने वाकडमधील विनोदे वस्ती आणि अल्हाट वस्ती दरम्यानच्या रस्त्यावर सापळा रचला. यावेळी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४.२० लाख रुपये किमतीचे ४२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. तसेच ३.२४ लाख रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली. अतुल शंकर बालगुडे (वय ३५, रा. मावळ तालुका) असे या संशयिताचे नाव आहे.
संशयिताविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८(क), २२(ब)(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबईतून साथीदाराला बेड्या
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा साथीदार शारुख ऊर्फ सद्दाम इक्बाल अंसारी (रा. गोवंडी) याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.
मार्गदर्शन आणि पथक:
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांनी या पथकाला सूचना दिल्या. या मोहिमेत API सोमनाथ पांचाळ, API दुर्गनाथ साळी, PSI अशोक दुधवणे, ASI नरेश बलसाने यांच्यासह चिंतामणी जोशी, कैलास केंगले, संदीप मासाळ, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर आणि अरुण पारधी या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
Hinjewadi Police Station
