મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

खेड शिवापूर टोल नाक्यावर ६० लाखांचा गुटखा जप्त

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकसह ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

PG
Prashik Ghaste

2 મિનિટ વાંચન

खेड शिवापूर टोल नाक्यावर ६० लाखांचा गुटखा जप्त

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकसह ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे: पुणे-बेंगळुरू महामार्गावर अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणारा एक मोठा ट्रक पकडला आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत ६० लाख २२ हजार ८०० रुपये किमतीचा ‘विमल’ गुटखा आणि २० लाख रुपयांचा ट्रक, असा एकूण ८० लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी हा साठा विक्रीसाठी मागवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी ट्रक चालक श्रीशैल तम्माराय हाळके (वय ३२, रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच हा माल मागवणाऱ्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील दोन सराईत आरोपींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज घाट ते खेड शिवापूर असा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २८) अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे कर्मचारी आंबेगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना गोपनीय बातमी मिळाली की, पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका सराईत आरोपीचा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा भरलेला ट्रक (क्र. एमएच ११ डीडी ६५२७) कात्रज घाटमार्गे पुण्यात येणार आहे.

या माहितीनुसार पोलिसांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कात्रज घाटात सापळा रचला. मात्र, बराच वेळ होऊनही ट्रक न आल्याने पोलिसांनी तांत्रिक माहिती घेतली असता, सदर ट्रक खेड शिवापूर टोल नाका येथे थांबल्याची खात्री झाली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांनी पुणे ग्रामीणच्या राजगड पोलिसांची मदत घेऊन टोल नाक्यावर उभा असलेला ट्रक पकडला.

तपासात मोठे रॅकेट उघड
ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ६० लाख रुपयांचा ‘विमल’ गुटखा सापडला. हा सर्व माल पुण्यातील दोन कुख्यात गुन्हेगारांनी शहरात विक्रीसाठी मागवला होता. पोलिसांनी गुटख्यासह १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २० लाखांचा ट्रक जप्त केला आहे.

याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ आणि ‘कोटपा’ (COTPA) कायद्यानुसार गुन्हा (गु.र.नं. १६६/२०२६) नोंदवण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विशाल भिलारे, मंगेश गुंड, अक्षय शिर्के आणि महिला पोलीस अंमलदार आशा भिंगारे यांच्या पथकाने केली आहे.

Gutkha worth 60 lakhs seized at Khed Shivapur toll plaza

શેર કરો