Gunaratna Sadavarte challenges Thackeray Brothers : दादरच्या ‘चैत्यभूमी’ नामांतरावरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात; रोहित पवारांवरही जोरदार टीका
• विरोध करणाऱ्यांना “गेट आऊट फ्रॉम दादर”चा सणसणीत इशारा; मनसे नेते व सुषमा अंधारेंना भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान
3 મિનિટ વાંચન

मुंबई :- दादर स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण भूमीचे ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्यांनी ‘गेट आऊट फ्रॉम दादर’ व्हावे, असा इशारा देत त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंसह आमदार रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
“बाळ ठाकरे आणि शरद पवारांप्रमाणेच दोन्ही ठाकरे बंधूंचे राजकारणही विझून जाईल”; ‘चैत्यभूमी’ नावाचे जोरदार समर्थन
पत्रकार परिषदेत बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “चांगले कार्य करायला गेल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोक अडथळे आणतात. दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यापासून कोणाचा बापही थांबवू शकत नाही. ज्यांना दादरमध्ये ‘चैत्यभूमी’ नावाने राहायचे नसेल, त्यांनी ‘गेट आऊट फ्रॉम दादर’ व्हावे.”
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला झालेल्या विरोधाचा संदर्भ देत ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे बाळ ठाकरे आणि शरद पवार यांनी पूर्वी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करून राजकारण केले, त्याच पावलावर पाऊल ठेवून आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ‘चैत्यभूमी’ नावाला विरोध करत आहेत. त्यावेळी गौतम वाघमारे यांच्या शहादतीनंतर शरद पवारांना माघार घ्यावी लागली होती. आता या दोन्ही ठाकरे बंधूंचेही राजकारण विझून जाईल आणि त्यांचा दिवा सुद्धा उरणार नाही.”
पुढे त्यांनी कुर्ला स्थानकाला ‘लोकमान्य टिळक टर्मिनस’ आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ नाव दिल्याचा दाखला देत, तेव्हा कोणी विरोध केला नाही, मग ‘चैत्यभूमी’ नावालाच विरोध का, असा सवाल उपस्थित केला. तसेच, राज आणि उद्धव ठाकरे यांनी बाळ ठाकरेंच्या विचारांऐवजी प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालल्यास त्यांचा राजकीय उद्धार होईल, असा सल्लाही त्यांनी दिला.
संदीप देशपांडे व बाळा नांदगावकरांना पक्षातील विरोधकांना लगाम घालण्याचे आवाहन; रोहित पवारांची ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ म्हणत खिल्ली
सदावर्ते यांनी मनसेतील संदीप देशपांडे आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांना आवाहन केले की, त्यांनी पक्षात खलबते करून या नामकरणाला विरोध करणाऱ्या छोट्या नेत्यांना लगाम घालावा. तसेच उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी गुळमुळीत बोलणे थांबवावे आणि सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर केलेल्या टीकेचाही सदावर्ते यांनी निषेध केला. “नवनाथ बन हे बिगर-मराठा, भटक्या-गोसावी समाजातून येतात म्हणून त्यांना लोकशाहीत बोलण्याचा अधिकार नाही का? रोहित पवारांची ही भाषा त्यांच्या छोट्या मेंदूतील जातीयवादी मानसिकता दाखवते,” असा आरोप त्यांनी केला. सुप्रिया सुळे यांची महत्त्वाकांक्षा तसेच अजित पवारांची दोन्ही मुले व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कर्तृत्वामुळे रोहित पवारांना स्वतःसाठी जागा उरलेली नाही, त्यामुळेच त्यांना ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ वाटत आहेत, अशी खिल्ली त्यांनी उडवली.
6 डिसेंबर रोजी येणाऱ्या अनुयायांसाठी कल्याणकारी निर्णय; टोल सवलतीचा विचारही पुढे
येत्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी राज्य शासन कल्याणकारी निर्णय घेत असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. दादरमधील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधीची कमतरता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असून, 6 डिसेंबरला येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्याचा विचारही उपमुख्यमंत्र्यांनी पुढे आणला आहे. तसेच, दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव दिले जाणार असले तरी जिथे डॉ. आंबेडकर यांचे चैत्य आहे, त्या प्रत्येक वास्तूला त्यांचे नाव देणे हा महाराष्ट्राचा गौरवच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

