‘छोटा हत्ती’ चोरणारी टोळी जेरबंद, दोन सराईत गुन्हेगारांना अटक
फुरसुंगी परिसरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
2 મિનિટ વાંચન

फुरसुंगी परिसरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावरील फुरसुंगी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने वाहने चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. चिखली परिसरातून ‘छोटा हत्ती’ टेम्पो चोरणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कन्हैयासिंग कालुसिंग टाक (वय ३३) आणि राजेशसिंग नानकसिंग दुधानी (वय ४८, दोघे रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेले सराईत गुन्हेगार आहेत.
गुप्त बातमीदाराकडून मिळाली माहिती
सोमवारी (ता. ४) गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांचे पथक फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर आणि नानासाहेब मोरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ दोन व्यक्ती चोरीचा टेम्पो घेऊन थांबल्या असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला.
कात्रीच्या साहाय्याने सुरू केला टेम्पो
पॉवर हाऊस ओव्हर ब्रिजखाली रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टेम्पोची (क्रमांक के.ए. ७१ ०५७८) झडती घेतली असता, तिथे कन्हैयासिंग टाक आणि राजेशसिंग दुधानी हे दोघे संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी हा टेम्पो चिखली येथील त्रिवेणी नगर परिसरातून चोरल्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी कात्रीच्या साहाय्याने टेम्पो सुरू करून तो पळवून आणला होता.
साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा टाटा छोटा हत्ती टेम्पो आणि २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या वाहन चोरीप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल असून, पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, बाळासाहेब सकटे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार, पल्लवी मोरे, मनीषा लोखंडे आणि अनिल जामगे यांच्या पथकाने केली आहे.
