Pune News : फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोप्रती ग्रामस्थ आक्रमक
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये नवीन प्रकल्प उभारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक झाला आहे.
2 મિનિટ વાંચન

Pune News : २०१७ च्या आदेशाचा दाखला देत महापालिकेवर ग्रामस्थांचा फसवणुकीचा आरोप ;५०० मेट्रिक टन क्षमतेचा नवीन प्रकल्प रद्द करण्याची मागणी; वर्क ऑर्डर मागे घेण्यावर आंदोलनकर्ते ठाम

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये नवीन प्रकल्प उभारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक झाला आहे. या भागात नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करू नये आणि टप्प्याटप्प्याने हा डेपो पूर्णपणे बंद करावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थ व नागरी कृती समितीच्या वतीने सलग २० दिवसांपासून कचरा डेपोच्या प्रवेशद्वारात तीव्र आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून आश्वासने दिली जात असली, तरी जोपर्यंत नवीन प्रकल्पाची वर्क ऑर्डर रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
सन २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये भविष्यात कोणताही नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार नाही आणि येथील डेपो टप्प्याटप्प्याने बंद केला जाईल, असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, हे आदेश धाबაზე बसवून महापालिका प्रशासनाने याच ठिकाणी ५०० मेट्रिक टन क्षमतेचा नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पाचे टेंडर मंजूर होऊन प्रत्यक्षात 'वर्क ऑर्डर' देखील काढण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासला आहे, असा गंभीर आरोप आंदोलकांकडून होत आहे.
नवीन प्रकल्पामुळे स्थानिकांना कोणतीही दुर्गंधी किंवा आरोग्यविषयक त्रास होणार नाही, अशी ग्वाही महापालिकेचे अधिकारी देत आहेत. मात्र, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. "पुणे शहराच्या आसपास दोन हजार एकरांहून अधिक सरकारी आणि गायरान जमीन उपलब्ध असताना, गेल्या अनेक दशकांपासून कचऱ्याचा त्रास सहन करणाऱ्या फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरातच पुन्हा नवीन प्रकल्प उभारण्याचा प्रशासनाचा अट्टहास का?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, नुकतीच स्थापन झालेली फुरसुंगी-देवाची नगरपरिषदने देखील आपल्या ठरावाद्वारे या नवीन प्रकल्पास कडाडून विरोध दर्शवला आहे आणि हा ठराव महापालिकेला पाठवला आहे.
आंदोलन सुरू झाल्यानंतर पुणे शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने खळबळ उडाली आहे. यावर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्ते विशाल हरपळे म्हणाले, "गेल्या २० दिवसांच्या या आंदोलनात ग्रामस्थांनी एकाही कचरागाडीला अडविलेले नाही किंवा वाहतुकीत अडथळा आणलेला नाही. असे असतानाही पुणे शहरात जर कचरा साचत असेल, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की, येथील सध्याच्या प्रकल्पात क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक कचरा आणून टाकला जात आहे. महापालिका या माध्यमातून शहरवासीयांची आणि आमची सरळसरळ फसवणूक करत आहे."
प्रकल्प परिसरात नियमांचे व कायदा-कानुनांचे पालन होत नसल्याच्या तक्रारींवरून ग्रामस्थांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) धाव घेतली होती. यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असून, ते येत्या आठवडाभरात आपला अहवाल सादर करणार आहेत.
विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल काय येतो आणि महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन प्रकल्पाची वर्क ऑर्डर रद्द केली जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा निर्धार फुरसुंगी व उरुळी देवाच्या ग्रामस्थांनी केला आहे.
