મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE CRIME : निमोणेत मातीचा बंधारा फोडल्याच्या वादातून शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला

दोन सख्ख्या भावांवर लोखंडी रॉडने प्रहार; तिघांविरुद्ध शिरूर पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

મ
મુબારક

2 મિનિટ વાંચન

Farmers attacked
Farmers attacked

दोन सख्ख्या भावांवर लोखंडी रॉडने प्रहार; तिघांविरुद्ध शिरूर पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर, प्रतिनिधी : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमोणे येथील घोडनदीच्या पात्रात शेतकऱ्यांनी पिकांच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी साठवून ठेवण्याकरिता तयार केलेली मातीची ताल (तात्पुरता बंधारा) काही तरुणांनी संगनमत करून फोडल्याने, त्याचा जाब विचारणाऱ्या दोन तरुण शेतकरी बांधवांवर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नदीपात्रातील पाणी साचवण्याची ताल का फोडली, या किरकोळ कारणाचा राग मनात धरून आलेल्या संशयित आरोपींनी दोन सख्ख्या भावांच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर आणि पाठीवर लोखंडी गजाने जबर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तीन संशयित आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

તસવીરો · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

नदीतील पाणी शेतीसाठी काही प्रमाणात साचून राहावे म्हणून केली ताल
या संदर्भातील गंभीर मारहाणीच्या आणि खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेबाबत निमोणे (ता. शिरूर) येथे राहणारे शेतकरी नानासो दत्तात्रय काळे (वय २९ वर्षे, व्यवसाय: शेती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी संकेत ज्ञानदेव काळे, शुभम ज्ञानदेव काळे आणि समीर प्रकाश शेलार (सर्व रा. निमोणे, ता. शिरूर) या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) सह फौजदारी प्रक्रिया संहिता सुधारणा कायदा, १९३२ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवार (ता. १८) जून २०२६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निमोणे गावच्या हद्दीतील घोडनदीच्या पात्रामध्ये घडली असून, गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिरूर पोलिसांनी या गुन्ह्याची अधिकृत नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी नानासो काळे आणि त्यांचे कुटुंबीय निमोणे परिसरात राहून शेती करतात. सध्या घोडनदी पात्रातील पाणी खोल गेल्यामुळे पिकांना पाणी मिळण्यात अडचण येत होती. त्यामुळे नदीतील पाणी शेतीसाठी काही प्रमाणात साचून राहावे या हेतूने स्थानिक शेतकऱ्यांनी नदीपात्रामध्ये मातीची एक ताल (तात्पुरता बंधारा) तयार केली होती. मात्र, गुरुवार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी संकेत काळे, शुभम काळे आणि समीर शेलार हे दोन मोटारसायकलवरून घोडनदीच्या पात्रात आले आणि त्यांनी ही मातीची ताल फोडण्यास सुरुवात केली. नदीची ताल फोडताना पाहून शेतात काम करणाऱ्या नानासो काळे यांनी तिकडे धाव घेत आरोपींना जाब विचारला की, ‘शेतकऱ्यांनी मेहनतीने बनवलेली ताल तुम्ही का फोडली?’

जाब विचारल्यावरून राग आला
याचाच तीव्र राग मनात धरून आरोपी संकेत काळे आणि शुभम काळे यांनी नानासो यांना जिवंत न सोडण्याच्या हेतूने त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने नानासो यांच्या डोक्यात, तोंडावर, पाठीवर आणि छातीवर सपासप वार केले. तर त्याचा साथीदार समीर शेलार याने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा जीवघेणा हल्ला होत असल्याचे पाहून नानासो यांचा भाऊ अक्षय काळे हा त्यांना वाचवण्यासाठी धावला. मात्र, संतापलेल्या आरोपी संकेत काळे आणि शुभम काळे यांनी अक्षय याच्या डोक्यात व पाठीवरही लोखंडी रॉडने गंभीर प्रहार केले आणि समीर शेलार याने त्यालाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली.

जखमी झालेल्या दोन्ही शेतकरी भावांना जागीच सोडून आरोपी त्यांना अद्वातद्वा शिवीगाळ करत आणि पुन्हा जाब विचारल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवरून पळून गेले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भागवत करत आहेत.

Farmers attacked with intent to kill following a dispute over the breaching of an earthen check dam in Nimone.

શેર કરો