Mumbai News : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात; भाषणानंतर आयोजकांवरही संतापले, म्हणाले
Mumbai News :मुंबई - मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.
2 મિનિટ વાંચન

Mumbai News :मुंबई - मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत २०१९ मधील सत्तास्थापनेवरून त्यांच्यावर निशाणा साधला. मात्र, राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच मेळाव्यानंतर शिंदे यांनी आयोजकांवर व्यक्त केलेल्या नाराजीचीही सध्या चर्चा रंगली आहे. व्यासपीठावरील माईकच्या व्यवस्थेवरून त्यांनी आयोजक कार्यकर्त्यांना सुनावल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
उद्धव ठाकरेंना ‘व्होट दरोडेखोर’ म्हणत हल्लाबोल
“२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत असतानाही तुम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं. तीच सर्वात मोठी व्होट चोरी होती,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे हेच खरे ‘व्होट दरोडेखोर’ असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाषण संपताच आयोजकांवर संताप
दसरा मेळाव्यातील भाषण संपवून मंचाच्या मागील बाजूस जात असताना एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर नाराजी व्यक्त केली. व्यासपीठावर माईक ठेवण्यात आलेल्या जागेवरून त्यांनी आयोजक कार्यकर्त्यांना जाब विचारला.
“कार्यक्रमाचं आयोजन कुणी केलं होतं? मला कोपऱ्यात कोणी टाकलं? पुढच्या वेळेस मला लोकांसमोर पाहिजे, लक्षात ठेवा,” अशा शब्दांत त्यांनी आयोजकांना सुनावल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शिंदे यांच्या संतापाची चर्चा सुरू झाली आहे.
‘आम्ही भाषण देणारे नाही, तर राशन देणारे’
मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या योजनांचा उल्लेख करत विरोधकांवरही निशाणा साधला. “आम्ही भाषण देणारे नाही, तर राशन देणारे आहोत,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या कामांचा दाखला दिला. परभणीपासून लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशीन आणि २५ हजार सायकलींचे वाटप सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.
पंतप्रधान मोदींचे कौतुक; विरोधकांवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनाही एकनाथ शिंदे यांनी लक्ष्य केले. “देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ३६ देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला. एकही दिवस सुट्टी न घेता देशाची सेवा करणाऱ्या पंतप्रधानांवर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहात. देशातील १४० कोटी जनता यासाठी तुम्हाला माफ करणार नाही,” असे ते म्हणाले.
राहुल गांधींवरही निशाणा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालय आणि घटनात्मक संस्थांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेणे हा देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचे ते म्हणाले.
“एका हातात संविधान घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनात्मक संस्थांवर हल्ला करायचा,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांच्या भूमिकेमुळे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि विरोधकांवरील टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, भाषणानंतर आयोजकांना सुनावल्याचा प्रकारही चर्चेचा विषय ठरला आहे.
