Deepak Kesarkar : "मी देवभक्त आहे, अंधश्रद्धानी नाही!"; भोंदू खरात प्रकरणावर दीपक केसरकरांनी सोडले मौन
•'ईशान्येश्वर' मंदिरामुळे ओळख, पण कृत्याशी संबंध नाही; "39 आमदार भेटले, मग माझंच नाव का?" केसरकरांचा सवाल
2 મિનિટ વાંચન

•'ईशान्येश्वर' मंदिरामुळे ओळख, पण कृत्याशी संबंध नाही; "39 आमदार भेटले, मग माझंच नाव का?" केसरकरांचा सवाल
मुंबई :- नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, आता राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव या प्रकरणात चर्चेत आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. खरातच्या सांगण्यावरून केसरकर मंत्रालयात जायचे, असा खळबळजनक दावाही केला गेला. या सर्व आरोपांवर अखेर दीपक केसरकर यांनी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली सडेतोड भूमिका मांडली आहे.
ओळखीचा उलगडा: 'शिवभक्ती' ठरली कारण
अशोक खरातशी ओळख कशी झाली, यावर बोलताना केसरकर म्हणाले, "मी लहानपणापासूनच शिवभक्त आहे आणि दर सोमवारी न चुकता शिवमंदिरात जातो. शिर्डीला दर्शनासाठी येताना वाटेत ईशान्येश्वर मंदिर लागते. त्या निमित्ताने माझी तिथे जाण्या-येण्याची सुरुवात झाली आणि खरातशी ओळख झाली. मात्र, ही ओळख केवळ एका भक्ताची मंदिराशी असलेली नाळ होती, त्यापलीकडे काहीही नाही."
"चुकीच्या कृत्याला शासन व्हायलाच हवे"
केसरकर यांनी खरातच्या कृत्याचे समर्थन करण्यास स्पष्ट नकार दिला. "ओळख असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग असणे असा होत नाही. जर मी त्यांना वाचवण्यासाठी एखादा फोन केला असेल, तर मी नक्कीच दोषी आहे. पण त्यांच्याकडून जे चुकीचे कृत्य घडले आहे, त्याची कठोर शिक्षा त्यांना मिळायलाच हवी, ही माझी ठाम भूमिका आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
गुप्त कारनाम्यांची सुतराम कल्पना नव्हती
भोंदूगिरीबद्दल माहिती का मिळाली नाही? या प्रश्नावर केसरकर यांनी हतबलता व्यक्त केली. "हे आमचे दुर्दैव आहे. मी मंत्री असताना तिथे जायचो, तेव्हा माझ्यासोबत पोलीस असायचे. पोलिसांनाही या अघोरी प्रकारांची कल्पना नव्हती, अन्यथा त्यांनी मला नक्कीच सावध केले असते. तिथे येणाऱ्या भक्तांमध्ये अनेक शिक्षकही होते, त्यांनीही कधी अशा प्रकारांबद्दल सांगितले नाही," असे ते म्हणाले.
"39 आमदार भेटले, मग माझंच नाव का?"
केसरकर यांनी यावेळी एक महत्त्वाचा सवाल उपस्थित केला. "त्या ठिकाणी केवळ मीच गेलो नव्हतो. मुख्यमंत्री स्वतः तिथे येऊन गेले आहेत, अनेक मंत्री आणि जवळजवळ 39 आमदार तिथे जाऊन आले आहेत. असे असताना केवळ माझेच नाव या वादात का ओढले जात आहे?" असा सवाल त्यांनी केला. मंत्रालयात जाण्याबाबत खरात सल्ला द्यायचे, हा दावा त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला. "श्रद्धा असू शकते, पण अंधश्रद्धा कधीही नसते," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
