Civic News : पुण्य कमविण्याचा सोस नागरिकांच्या जीवावर बेततोय
भटक्या श्वानांना सार्वजनिक रस्ते किंवा संवेदनशील ठिकाणी खाऊ घालण्यास निर्बंध
2 મિનિટ વાંચન

पुणे, निलेश राऊत : मुक्या प्राण्यांवर प्रेम करा हे मान्य आहे. पण सध्या भटक्या श्वानांचा उपद्रव नागरिकांच्या मुळावर उठला आहे. प्रत्येक रस्त्यावर श्वानांची वाढलेली संख्या, दुचाकी चालकांवर व पादचाऱ्यावर हल्ले यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांबाबत राज्य शासनाने सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी १४ कलमी कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्य कमविण्याचा सोस असलेल्या काही नागरिकांना यापुढे भटक्या श्वानांना सार्वजनिक रस्ते किंवा संवेदनशील ठिकाणी खाऊ घालण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.Civic News
शासनाच्या सूचनांनुसार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, रेबीजविरोधी लसीकरण आणि आश्रयव्यवस्था बंधनकारक केली आहे. तसेच शाळा, रुग्णालये, बसस्थानके, रेल्वेस्थानके, क्रीडा संकुले आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या भटक्या श्वानांना पकडून पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्यास बंदी घातली आहे.

नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रथमच भटक्या श्वानांना रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित होतील. त्या ठिकाणी स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.Civic News
मार्गदर्शक सूचना
श्वानांचे शंभर टक्के निर्बीजीकरण व लसीकरण. आश्रयगृहे उभारणे. तक्रार निवारण यंत्रणा आणि हेल्पलाइन. फीडिंग झोन निश्चित करणे. धोकादायक ठिकाणांहून श्वानांचे स्थलांतर, स्वयंसेवी संस्था व पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सहभाग. नियमित सर्वेक्षण व श्वान गणना. नागरिक जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.
श्वानांना खाऊ घालण्यासाठी परवानगी, फीडिंग झोन
भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक राहील. त्यासाठी निश्चित केलेल्या ‘फीडिंग झोन’मध्येच खाऊ घालता येणार असून, सार्वजनिक रस्ते किंवा संवेदनशील ठिकाणी खाऊ घालण्यास निर्बंध असतील. प्राणिप्रेमींच्या मागणीनुसार शहरात २३ फीडिंग पॉइंट निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.Civic News

तक्रारींसाठी हेल्पलाइन
नागरिकांना २४ x ७ तक्रार नोंदविण्यासाठी महापालिकेची १८००१०३०२२२ टोल फ्री हेल्पलाइन सुरू आहे. त्यानुसार श्वानदंश, आक्रमक श्वान किंवा इतर तक्रारींवर कारवाई करण्यात येत आहे.

शेल्टर होमची जागा निश्चित
भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शिंदेवाडी, भूगाव आणि रामटेकडी येथे शेल्टर होम व निर्बीजीकरण केंद्रांसाठी जागा निश्चित केली आहे. शिंदेवाडी आणि भूगाव येथील प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, सध्या कार्यरत संस्थांकडे दररोज २१४ कुत्र्यांवर निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याची क्षमता आहे. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १४ हजार ७५६ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या अचूक संख्येची माहिती उपलब्ध झाल्यानंतर निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि प्राणी जन्मनियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतील. या मोहिमेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माहिती संकलित करण्यात येत आहे.
डॉ. सारिका फुंडे-भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.

भटक्या कुत्र्यांना काही श्वानप्रेमी विविध प्रकारची बिस्कीटे, केक आदी गोड पदार्थ खाऊ घालतात. या पदाथार्मध्ये जास्त प्रमाणात साखर असल्याने त्यांना मधुमेह होऊ शकतो. याबरोबरच तोंडातून लाळ गळणे, जंत होणे असे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा अशा त्रासांमुळे कुत्रे सुस्त होतात. त्यामुळे श्वानप्रेमींनी भटक्या कुत्र्यांना दूध, पोळी, भाकरी खायला घालावे किंवा परवडणाऱ्या किमतीत मिळणारे डॉग फूड खाऊ घालावे.
डॉ. प्रतीकसिंग राजपूत, प्राणिज व्हेटनरी क्लिनीक
