पुन्हा विमान कोसळले, बारामती हादरली!
उसाच्या शेतात पडले शिकाऊ विमान; विजेच्या खांबाला धडकूनही वैमानिक सुखरूप
2 મિનિટ વાંચન

उसाच्या शेतात पडले शिकाऊ विमान; विजेच्या खांबाला धडकूनही वैमानिक सुखरूप
बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका पुन्हा एकदा विमान अपघाताने हादरला आहे. बुधवारी सकाळी रेडबर्ड एव्हिएशन (Redbird Aviation) कंपनीच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या भीषण अपघातात विमानाचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला आणि विमान थेट उसाच्या शेतात कोसळले. सुदैवाने, प्रशिक्षणार्थी वैमानिकाने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचे प्राण वाचले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८:४० च्या सुमारास रेडबर्ड कंपनीच्या विमानाने बारामती विमानतळावरून नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली. गोजुबावी गावाच्या हद्दीत विमान असताना ते नियंत्रणाबाहेर जाऊ लागले. जमिनीवर कोसळण्यापूर्वी विमानाचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला, ज्यामुळे विमानाचे मोठे नुकसान झाले.
उसाच्या शेतात सुरक्षित लँडिंग; मोठा अनर्थ टळला
विमानात तांत्रिक बिघाड झालेला असतानाही प्रशिक्षणार्थी वैमानिकाने धिरज सोडला नाही. त्याने लोकवस्ती टाळून शेजारीच असलेल्या एका उसाच्या शेतात विमानाचे ‘क्रॅश लँडिंग’ केले. यामुळे जमिनीवरील नागरिकांना कोणतीही इजा झाली नाही. अपघातानंतर वैमानिक सुखरूप बाहेर पडला असला, तरी या भीषण घटनेमुळे तो मोठ्या मानसिक धक्क्यात (शॉक) असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस आणि प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीपसिंह गिल आणि स्थानिक पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. “विमान कमी उंचीवरून उडत असताना तांत्रिक बिघाड झाला होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून नागरी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत,” अशी माहिती पोलीस अधीक्षक गिल यांनी दिली.
रेडबर्ड कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
बारामतीमध्ये रेडबर्ड आणि कारवार एव्हिएशन या दोन संस्था वैमानिक प्रशिक्षण देतात. मात्र, रेडबर्ड कंपनीच्या विमानांचे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील या कंपनीच्या विमानांचे अपघात झाले असून त्यांच्यावर काही काळ बंदीही घालण्यात आली होती. विशेष म्हणजे, ज्या गोजुबावी गावात हा अपघात झाला, त्याच परिसरात काही काळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानालाही अपघात झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे आता प्रशिक्षण संस्थांच्या सुरक्षा मानकांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Another plane crash, Baramati shaken!
