મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

दौंडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच तक्रारदार तरुणावर कोयत्याने हल्ला

पोलीस ठाण्यासमोरच अशा प्रकारे खुनी हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे

PG
Prashik Ghaste

2 મિનિટ વાંચન

दौंडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच तक्रारदार तरुणावर कोयत्याने हल्ला

पोलीस ठाण्यासमोरच अशा प्रकारे खुनी हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे

पुणे: दौंड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय तरुणावर पोलीस ठाण्यासमोरील पार्किंगमध्येच १० ते १२ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मयूर पोपट सुळ (वय ३०, रा. गोपाळवाडी, ता. दौंड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संकेत राजू होले, प्रतीक महादेव होले, राजू दिनकर होले, ऋषीकेश रमेश होले, साजन गिरमे, शेखर झोरे, श्रीनाथ सोपान होले, गोरख बनकर, संदीप छगन होले आणि इतर ३ ते ४ अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३) आणि १९२ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

संशयित दबा धरून बसले होते
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर सुळ आणि त्यांचे नातेवाईक सोमवारी (ता. २७) रात्री नऊच्या सुमारास आरोपी संकेत होले याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी दौंड पोलीस ठाण्यात जात होते. ते पोलीस ठाण्याच्या शेजारील पार्किंगमध्ये पोहोचले असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. सुरुवातीला प्रतीक होले याने भांडण काढले, त्यानंतर इतर आरोपींनी तिथे बेकायदेशीर जमाव जमवला.

भररस्त्यात जीवे मारण्याचा प्रयत्न
आरोपी संकेत होले याने जमावाला, "मयूरला ठार मारा," अशी चिथावणी दिली. त्यानंतर शेखर झोरे याने मयूरला धक्का देऊन खाली पाडले. त्याचवेळी संकेत होले याने मयूरचा गळा कापण्याच्या उद्देशाने हातातील कोयत्याने वार केला, मात्र मयूरने तो वार चुकवल्याने तो थोडक्यात बचावला. त्यानंतर संकेतने दुसऱ्या हातातील धारदार वस्तूने मयूरच्या डोक्यावर प्रहार केला. साजन गिरमे याने लोखंडी रॉडने मयूरच्या कमरेवर मारून त्याला जखमी केले, तर उर्वरित जमावाने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या आवारात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यासमोरच अशा प्रकारे खुनी हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक बिंदी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

શેર કરો