મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

बारामतीत नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांचा गंडा

आरोपीने फिर्यादीला आरोग्य विभागात शासकीय सेवेत चालक म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

बारामतीत नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांचा गंडा

आरोपीने फिर्यादीला आरोग्य विभागात शासकीय सेवेत चालक म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते

पुणे: आरोग्य विभागात शासकीय वाहन चालक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका ३३ वर्षीय तरुणाची ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बारामतीमध्ये उघडकीस आला आहे. हक्काचे पैसे परत मागितले असता, “तुला काय करायचे ते कर, मी कोणाला भित नाही,” अशी धमकी दिल्याने पीडित तरुणाने पोलिसांत धाव घेतली आहे.

धीरज संभाजी गजरमल (वय ३३, रा. कसबा, बारामती) यांनी यासंदर्भात बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून वैभव साहेबराव जगताप (रा. रुई ग्रामीण रुग्णालय क्वार्टर, बारामती) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल व्यवहारातून उकळले पैसे
मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक मे २०२४ पासून १५ जानेवारी २०२५ या कालावधीत वेळोवेळी घडली. आरोपी वैभव जगताप याने फिर्यादी धीरज यांना आरोग्य विभागात शासकीय सेवेत चालक म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळवून देतो, असा विश्वास दिला. या मोबदल्यात त्याने टप्प्याटप्प्याने एकूण ६ लाख रुपये मागितले. फिर्यादीने हे पैसे फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) आणि काही रक्कम रोख स्वरूपात आरोपीला दिली.

धमकावल्याने पोलिसांत धाव
नोकरी मिळत नसल्याचे आणि फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने आपले दिलेले पैसे आरोपीकडे परत मागितले. मात्र, आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ करत फिर्यादीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. “जा, तुला काय करायचे ते कर, मी कुणाला भीत नाही,” अशी दमदाटी करत त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या मानसिक त्रासानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बारामती तालुका पोलिसांत या प्रकरणाची नोंद झाली असून ग्रेड पोलीस उपनिरीक्षक (PSI) राम भोसले या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

શેર કરો