મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

१२ गुंतवणूकदारांची १.२२ कोटींची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले, संशयित फरार

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

१२ गुंतवणूकदारांची १.२२ कोटींची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले, संशयित फरार

पिंपरी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा ५ टक्क्यांपर्यंत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने १२ गुंतवणूकदारांची सुमारे १ कोटी २२ लाख ७५ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी नितीन भास्कर माने (रा. मंगलविश्व सोसायटी, किवळे) नावाच्या आरोपीविरुद्ध फसवणूक आणि बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहे. ही फसवणूक ३ एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत किवळे येथील 'एनबीएम ट्रेडर्स' आणि 'अ‍ॅरिस्टो व्हिजन सोसायटी' परिसरात करण्यात आली. याप्रकरणी एका गुंतवणूकदाराने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. त्याने गुंतवणूकदारांना दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या लोकांकडून मोठी रक्कम गोळा केली. तक्रारदाराकडून १५ लाख रुपये घेण्यात आले होते, त्यापैकी आरोपीने ९ लाख ८ हजार ५०० रुपये परत केले, मात्र उर्वरित ५ लाख ९१ हजार 500 रुपये दिले नाहीत. तपासात समोर आले की, आरोपीने इतर ११ गुंतवणूकदारांकडूनही एकूण १ कोटी १६ लाख ८४ हजार ४०० रुपये जमा केले होते. अशा प्रकारे एकूण फसवणुकीचा आकडा १ कोटी २२ लाख ७५ हजार ९०० रुपयांवर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांचे पैसे घेतल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल फोन बंद केला आणि तो फरार झाला. देहूरोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

શેર કરો