મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

ॲक्टिंग क्लासमध्ये झाडू मारताना रडकुंडीला आली होती दीपिका

‘इफ्फी’त अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा; सहज अभिनयासाठी घरकाम करणाऱ्या महिलेला वर्गात बोलावून दिला धडा

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

ॲक्टिंग क्लासमध्ये झाडू मारताना रडकुंडीला आली होती दीपिका
‘इफ्फी’त अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा

पणजी : गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या सुरुवातीच्या दिवसांतील एक किस्सा सांगितला. त्यांच्या अभिनय शाळेत एका सरावात दीपिकाला झाडू मारणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारायची होती. वारंवार रिटेक द्यावे लागल्याने ती इतकी त्रस्त झाली, की तिच्या डोळ्यांत जवळपास अश्रू आले होते, असे खेर यांनी सांगितले.

महोत्सवातील पॅनेल चर्चेत खेर यांनी अभिनयातील बारकावे आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. २००७ मध्ये फराह खान यांच्या ‘ओम शांती ओम’मधून पदार्पण करण्यापूर्वी दीपिकाने मुंबईतील खेर यांच्या ‘ॲक्टर प्रिपेयर्स’ या अभिनय शाळेत तीन महिन्यांचा अभ्यासक्रम केला होता. ती या शाळेच्या दुसऱ्या तुकडीची विद्यार्थिनी होती. तोपर्यंत फराह खान यांनी तिला शाहरुख खानची नायिका म्हणून निवडले होते.

चहाचा कपही खास शैलीत

खेर म्हणाले, “दीपिका त्या वेळी प्रसिद्ध मॉडेल होती आणि अतिशय सुशिक्षित कुटुंबातून आली होती. त्यामुळे तिचे वागणे शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत होते. ती चहाचा कपही एका खास शैलीत उचलायची. त्यामुळे अनेकदा तिच्या अभिनयात सहजता आणि विश्वासार्हतेचा अभाव जाणवायचा.”

झाडूतही नजाकत

एके दिवशी वर्गात खेर यांनी दीपिकाला केवळ जमिनीवर झाडू मारणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका दिली. मात्र, दीपिकाने झाडू मारण्याचे कामही अतिशय नजाकतीने आणि आकर्षकपणे केले. ते त्या भूमिकेला साजेसे वाटत नव्हते. त्यानंतर खेर यांनी आपल्या घरी काम करणाऱ्या महिलेलाच वर्गात बोलावले आणि झाडू मारण्यास सांगितले. तिने ते काम अगदी सहजपणे आणि आत्मविश्वासाने केले.

हे उदाहरण दाखवल्यानंतर, अभिनय पूर्णपणे खरा वाटेपर्यंत हा सराव सुरूच राहील, असे खेर यांनी दीपिकाला सांगितले. सतत प्रयत्न करूनही अपेक्षित भाव उमटत नसल्याने दीपिका सुरुवातीला खूप निराश झाली होती.

हार न मानता जिंकले

मात्र, दीपिकाने हार मानली नाही. सतत प्रयत्न करत अखेर तिने ते दृश्य उत्तम साकारले. सराव पूर्ण झाल्यानंतर तिने या शिकवणीसाठी खेर यांचे आभारही मानले. तीन महिन्यांच्या या प्रशिक्षणानंतर दीपिकाने २००७ मध्ये ‘ओम शांती ओम’मधून दमदार पदार्पण केले. आज ती देशातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper