२५ कोटींच्या ट्रेनिंग सेंटरसाठी ५ कोटींची मागणी? संजय राऊतांचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतरही पैसे दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर करणार नसल्याचा दावा; शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी
2 મિનિટ વાંચન

मुंबई, महाराष्ट्र मिरर : अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लातूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या २५ कोटी रुपयांच्या ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतरही पैसे दिल्याशिवाय काम होणार नसल्याची भूमिका मंत्र्यांनी घेतल्याचा दावा राऊत यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. लातूरमधील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी मातंग समाजातील तसेच दलित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रस्ताव प्रलंबित असल्याचे राऊत म्हणाले.
या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी मंत्री शिरसाट यांनी २० टक्के रक्कम म्हणजेच पाच कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला. उदगीरकर यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर प्रस्ताव मंजूर झाला नाही, असेही राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, उदगीरकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र, तक्रारीची माहिती मंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर पैसे दिल्याशिवाय काम करणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी उदगीरकर यांनीही आपली बाजू मांडत मंत्र्यांच्या भेटीत २० टक्के रकमेची मागणी झाल्याचा दावा केला. शिरसाट यांच्याशी संबंधित २७ प्रकरणांची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगत राऊत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, या आरोपांवर संजय शिरसाट यांची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध नसल्याने आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.

મહારાષ્ટ્ર મિરર
