हेल्थ प्रोटीन पावडरवर एफडीएची नजर; जिम चालक, विक्रेतेही रडारवर
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप; राज्यभरातील ११०० व्यावसायिकांची तपासणी होणार
2 મિનિટ વાંચન

पुणे : तरुणांमध्ये फिटनेस आणि शरीरयष्टी कमावण्याची वाढती क्रेझ लक्षात घेता हेल्थ सप्लिमेंट्स आणि प्रोटीन पावडरच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लक्ष केंद्रित केले आहे. स्नायू झटपट वाढविणे, वजन कमी करणे किंवा विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्याचे आमिष दाखवून प्रोटीन पावडरची विक्री करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. उत्पादकांपासून वितरक, विक्रेते, जिम चालक आणि ऑनलाइन विक्री करणाऱ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांची तपासणी केली जाणार आहे.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. अनेक जिममध्ये प्रशिक्षक आणि कर्मचारी तरुणांना विशिष्ट प्रोटीन पावडर घेतल्याने स्नायू लवकर वाढतील, असे सांगून उत्पादनांची विक्री करतात. मात्र, अशा उत्पादनांना औषधांसारखे वैद्यकीय फायदे असल्याचा दावा करण्याचा अधिकार संबंधितांना नाही. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चुकीचे दावे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यात हेल्थ सप्लिमेंट्स आणि न्यूट्रास्युटिकल्स क्षेत्रातील सुमारे ११०० परवानाधारक व्यावसायिक आहेत. यामध्ये ३१३ उत्पादक, ७५९ री-लेबलिंग करणारे आणि २८ पॅकिंग करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश आहे. या सर्वांची जोखमीनुसार तपासणी केली जाणार आहे. यामध्ये जिम, औषध विक्रीची दुकाने, गोदामे, वितरक आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचाही समावेश असेल.
दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सहा विभागांमधील १७ आस्थापनांवर केलेल्या कारवाईत सुमारे १ कोटी ३९ लाख रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे विभागातही सुमारे ३०.५७ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्रोटीन पावडर किंवा हेल्थ सप्लिमेंट्स खरेदी करताना ग्राहकांनी उत्पादनावरील एफएसएसएआय परवाना क्रमांक, घटकांची माहिती, वापरण्याची पद्धत आणि आवश्यक सूचना तपासाव्यात. झटपट स्नायू वाढविण्याचे किंवा आजार बरे करण्याचे दावे करणाऱ्या उत्पादनांपासून सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

મહારાષ્ટ્ર મિરર
