हडपसरमधील ४७ लाखांच्या घरफोडीचा उलगडा
आरोपीकडून ३६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
2 મિનિટ વાંચન

पुणे, महाराष्ट्र मिरर : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हडपसरमधील नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीत झालेल्या तब्बल ४७ लाख १९ हजार रुपयांच्या घरफोडीचा गुन्हे शाखेच्या युनिट सहाने उलगडा केला आहे. या प्रकरणी रोहित ऊर्फ पिल्ल्या प्रवीण पवार (वय २५, रा. हुतात्माबाबा आळंदी, सिताबाई मंदिराजवळ, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ९ लाख ४८ हजार रुपये रोख आणि २५.१ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १.३० ते सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हडपसर येथील नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीतील एका घराच्या देवघराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. घरातील देवघरात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४७ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडे देण्यात आली होती. युनिट सहाचे पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव आणि पथकाने सलग दहा दिवस तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास केला. त्यातून रोहित ऊर्फ पिल्ल्या पवार याची ओळख निष्पन्न झाली.
आरोपी आपल्या मूळ गावी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार संतोष राठोड यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून पाठलाग केला आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ९ लाख ४८ हजार रुपये रोख आणि २५.१ तोळे सोन्याचे दागिने, असा एकूण ३६ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट सहाचे पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुणा म्हेत्रे तसेच पोलीस अंमलदार नानासाहेब मोरे, प्रशांत कर्णवर, सतीश वणवे, अमित सस्ते, झाकीर पठाण, समीर पांडुळे, अमित कांबळे, अश्विनी गायकवाड, अनिल जामगे, संभाजी गायकवाड, गणेश माने, अक्षय बांदल आणि संतोष राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
