सौरव दास यांच्याविरोधात मुंबई पोलिसांचे लुकआऊट सर्क्युलर; केंद्राची हायकोर्टात माहिती
लंडन दौऱ्यापूर्वी दिल्ली विमानतळावर रोखले होते; पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या नोंदीवरूनही कारणे दाखवा नोटीस, ९ डिसेंबरला पुढील सुनावणी
3 મિનિટ વાંચન

नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक आणि प्रवक्ते सौरव दास यांना लंडनला जाण्यापासून रोखण्यात आल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सौरव दास यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केले होते. त्यामुळेच त्यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) दिल्ली उच्च न्यायालयात दिली. दरम्यान, त्यांच्या पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या नोंदीबाबतही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सौरव दास यांना २३ नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी लंडनला जाण्यापासून रोखले होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात भारतातील 'कॉकरोच मूव्हमेंट' या विषयावर त्यांना भाषण द्यायचे होते. याशिवाय ब्रिटनमधील अन्य काही विद्यापीठांमध्येही त्यांचे कार्यक्रम नियोजित होते. मात्र, दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली.
या घटनेनंतर दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली होती. विमानतळावर आपल्याला प्रवास रोखण्याचा कोणताही लेखी आदेश दाखवण्यात आला नाही. तसेच लुकआऊट सर्क्युलर असल्याची माहितीही देण्यात आली नाही, असा दावा त्यांनी केला होता. यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत प्रवास रोखण्याच्या निर्णयाला आव्हान दिले.
केंद्र सरकारने न्यायालयात काय सांगितले?
गुरुवारी न्यायमूर्ती अमित महाजन यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून सौरव दास यांच्याविरोधात २३ नोव्हेंबर रोजी लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. या सर्क्युलरच्या आधारेच त्यांना विमानतळावर रोखण्यात आले.
दुसरीकडे, दास यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अखिल सिब्बल यांनी बाजू मांडली. दास यांना लुकआऊट सर्क्युलर जारी केल्याची, तसेच ते कोणत्या कारणासाठी जारी करण्यात आले याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. परदेशात प्रवास करणे हा मूलभूत अधिकार असून, त्यावर मनमानी पद्धतीने निर्बंध घालता येणार नाहीत, असा युक्तिवादही त्यांनी केला.
पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या नोंदीवरून नोटीस
या प्रकरणात पासपोर्टमधील कथित विसंगतीचाही मुद्दा समोर आला आहे. चेन्नई येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने २३ नोव्हेंबर रोजी सौरव दास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांच्या पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या नोंदीबाबत सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच स्पष्टीकरण देईपर्यंत संबंधित पासपोर्टचा वापर करून प्रवास करू नये, असेही सूचित करण्यात आले होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही याबाबत स्पष्टीकरण देताना संबंधित पासपोर्ट कार्यालयाने कायद्याच्या प्रक्रियेनुसार ही नोटीस बजावल्याचे सांगितले होते. पासपोर्ट अर्जात योग्य माहिती देणे आवश्यक असून, माहितीमध्ये विसंगती किंवा तथ्य लपवल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून स्पष्टीकरण मागवले जाते, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
९ डिसेंबरला पुढील सुनावणी
सौरव दास यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या लुकआऊट सर्क्युलरचे कारण, पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या नोंदीतील कथित विसंगती आणि परदेश प्रवासावरील निर्बंध याबाबत न्यायालयात काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणी न्यायालयाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही.

મહારાષ્ટ્ર મિરર

