મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

सुतारदरा टेकडीफोड प्रकरण ; मे. हिलतेज रियॅल्टी अँड डेव्हलपर्स’वर काय कारवाई होणार?

सदर घटना ३१ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आली; गंगाधाम परिसरातील टेकडीफोड प्रकरणानंतरही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

4 મિનિટ વાંચન

सुतारदरा टेकडीफोड प्रकरण ; मे. हिलतेज रियॅल्टी अँड डेव्हलपर्स’वर काय कारवाई होणार?
सदर घटना ३१ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आली; गंगाधाम परिसरातील टेकडीफोड प्रकरणानंतरही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही

सदर घटना ३१ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आली; गंगाधाम परिसरातील टेकडीफोड प्रकरणानंतरही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही

महत्वाचे मुद्दे

*तक्रारी दाखल झाल्यानंतर पालिका प्रशासनाने ‘मे. हिलतेज रियालिटी अँड डेव्हलपर्स एल. एल. पी.’ला काम थांबवण्याची नोटीस बजावली

*आदेशापूर्वी टेकडीचे जे अतोनात नुकसान झाले आहे, त्याची भरपाई कोण देणार आणि दोषींवर कठोर कारवाई केव्हा होणार? असा संतप्त सवाल आपने केला आहे

*संबंधित बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी महापालिका आयुक्तांकडे आपची मागणी

*संबंधित ठिकाणी किती झाडे तोडली गेली, याचा सविस्तर अहवाल द्यावा आणि तोडलेल्या झाडांच्या एकूण वयाएवढी नवीन झाडे त्याच विकासकाकडून लावून त्यांचे संगोपन करून घ्यावे अशीही मागणी

पुणे, धनश्री ओतारी

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि निसर्गसंपन्न शहर अशी ओळख असलेल्या पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या येथील टेकड्या फक्त पैसे कमावण्यासाठी अनधिकृतरित्या सपाट केल्या जात आहेत. शहराच्या पर्यावरणाचा कणा असलेल्या या टेकड्यांवर गेल्या काही वर्षांत वाढते काँक्रीटीकरण, अनियंत्रित बांधकामे आणि कायद्यातील पळवाटा शोधून होणारे अतिक्रमण यामुळे भीषण संकट ओढवले आहे.

याचाच ताजा प्रत्यय कोथरूडमधील सुतारदरा परिसरात आला असून, सर्व्हे क्रमांक ११३ (११३/१ आणि ११३/२) मधील जैवविविधता उद्यान (बीडीपी) आणि हिलटॉप-हिलस्लोप झोनमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय टेकडी फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविरोधात आम आदमी पार्टीने (आप) आक्रमक पवित्रा घेत संबंधित बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पत्र्याचे कुंपण घालून रातोरात उत्खनन

कोथरूडमधील सुतारदरा येथील तीव्र डोंगरउतारावर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याची बाब ३१ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आली होती. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असता, संबंधित परिसरात पत्र्याचे कुंपण उभारून आतील बाजूने बेकायदेशीरपणे टेकडी फोडण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. गंगाधाम परिसरातील टेकडी फोड प्रकरणानंतरही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही.

याप्रकरणी महापालिकेकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रशासनाने ‘मे. हिलतेज रियालिटी अँड डेव्हलपर्स एल. एल. पी.’ या संबंधित विकासकाला काम थांबवण्याची नोटीस बजावली आणि जेसीबीद्वारे सुरू असलेले उत्खनन थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, "केवळ काम थांबवण्याची नोटीस देऊन प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कामबंदीच्या आदेशापूर्वी टेकडीचे जे अतोनात नुकसान झाले आहे, त्याची भरपाई कोण देणार आणि दोषींवर कठोर कारवाई केव्हा होणार?" असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे.

‘एकास पाच’ नियमांचे उल्लंघन आणि बोगस कागदपत्रांचा खेळ

पुण्यातील डोंगरउतारांवरील बांधकामांबाबत स्पष्ट नियम असतानाही, ‘एकास पाच’ (१:५) या बांधकाम गुणोत्तराचे बोगस कागदपत्रांच्या आधारे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आरोप होत आहे. सुतारदरा येथील या प्रकरणात संबंधित जमिनीचे विकास आराखड्यातील (डीपी) नेमके वर्गीकरण काय, डोंगरउतारावरील खोदकामासाठी कोणत्या परवानग्या घेतल्या गेल्या, नैसर्गिक उतारात किती फेरफार करण्यात आला आणि त्यातून पर्यावरणाची किती हानी झाली, याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. वाहनांची प्रचंड संख्या आणि घटणारे हरितक्षेत्र यामुळे आधीच पुण्याच्या हवेचा दर्जा खालावत असताना, अशा प्रकारे टेकड्या फोडणे शहराच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते.

आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी याप्रकरणी आयुक्तांना निवदेन दिले असून, सुतारदरा कोथरूड येथील अनधिकृत खोदकाम आणि गौण खनिज उत्खननाची तात्काळ ईटीएस पद्धतीने मोजणी करून नेमके किती उत्खनन झाले आहे, याची आकडेवारी जाहीर करावी. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास करणाऱ्या ‘मे. हिलतेज रियालिटी अँड डेव्हलपर्स एल. एल. पी.’ या बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

टेकड्यांच्या या विध्वंसाला आणि अनधिकृत कामाला पाठीशी घालणाऱ्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या महापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. संबंधित ठिकाणी आतापर्यंत किती झाडे तोडली गेली, याचा सविस्तर अहवाल तयार करावा आणि तोडलेल्या झाडांच्या एकूण वयाएवढी नवीन झाडे त्याच विकासकाकडून लावून त्यांचे संगोपन करून घ्यावे अशी मागणी केली आहे.

पुणेकरांचे लक्ष आयुक्तांच्या भूमिकेकडे

"पुण्याच्या टेकड्या हे शहराचे नैसर्गिक कवच आणि महत्त्वाचे पर्यावरण आहे. पर्यावरणाचा घात करणाऱ्या कोणालाही थारा दिला जाणार नाही," असा इशारा आपचे रविराज काळे यांनी दिला आहे. तसेच जमिनीचा अधिकृत सर्वेक्षण अहवाल, ईटीएस मोजणी, परवानगीची सद्यस्थिती आणि पर्यावरण नुकसानाचे मूल्यांकन याची सविस्तर माहिती प्रशासनाने लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. आता महापालिका प्रशासन केवळ नोटिशीचा फार्स करते की पर्यावरण रक्षणासाठी कठोर पावले उचलते, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper