समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात; २० ते ३० वाहनांचा विचका, २२ जण जखमी
भरधाव ट्रकने वाहनांच्या रांगेला दिली जोरदार धडक; पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर, बुलढाण्यातील मेहकरजवळ दुर्घटना
1 મિનિટ વાંચન

बुलढाणा : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आज (१३ नोव्हेंबर) सकाळी भीषण साखळी अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात भरधाव ट्रकने रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना जोरदार धडक दिल्याने अनेक वाहनांचा चुराडा झाला. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार २० ते २२ जण जखमी झाले असून, त्यापैकी पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर एक टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून जवळपास ४० ते ५० वाहने थांबवली होती. दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने या वाहनांच्या रांगेत घुसून जोरदार धडक दिली. त्यामुळे एकापाठोपाठ अनेक वाहने एकमेकांवर आदळली आणि मोठा अपघात घडला.
या अपघातात सुमारे १५ ते २० वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने मेहकर येथील जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, बचावकार्य आणि अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची अधिकृत संख्या याबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
