મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

शेतकऱ्यांना संभ्रमात टाकू नका; सरकार चर्चेस तयार

बावनकुळे यांचे रोहित पवारांना आवाहन

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा करण्याऐवजी सरकारला अधिकृत नोटीस द्यावी. त्यानंतर बैठक घेऊन मागण्यांवर निश्चितपणे मार्ग काढू, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. दुष्काळाच्या नावाखाली शेतकऱ्यांना संभ्रमात टाकून त्यांची मानसिकता कमकुवत करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी नऊ मंत्र्यांच्या दुष्काळ निवारण उपसमितीची साप्ताहिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यास सकारात्मक असताना मोर्चा काढण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोर्चा राजकीय असेल तर तो वेगळा विषय आहे. मात्र, आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणे योग्य नाही. रोहित पवार यांनी केवळ मोर्चाची घोषणा न करता सरकारकडे अधिकृत नोटीस द्यावी. त्यानंतर सरकार बैठक घेऊन मागण्यांवर मार्ग काढेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

२० ते २२ लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

दिवाळीपूर्वी जाहीर झालेली पाच हजार रुपयांची मदत तांत्रिक कारणांमुळे अद्याप न मिळालेल्या राज्यातील २० ते २२ लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, ई-केवायसी आणि पीक पाहणीची प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवण्याचे धोरण

कोयना प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, नद्या आणि नाल्यांमधून समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून ते दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'झिरो डिस्चार्ज' हा महत्त्वाचा कार्यक्रम असून, राज्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी आणि जीडीपी वाढवण्यासाठी या धोरणावर काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર