મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

वारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

गांजा विक्रीप्रकरणी ५५ वर्षीय महिलेला अटक; यापूर्वीही अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

वारजेत सराईत महिलेकडून ५९२ ग्रॅम गांजा जप्त; ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गांजा विक्रीप्रकरणी ५५ वर्षीय महिलेला अटक; यापूर्वीही अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे परिसरात गांजा विक्री करणाऱ्या अभिलेखावरील सराईत महिलेला गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने ताब्यात घेतले. सुनीता सिकंदर भाट (वय ५५, रा. वारजे, पुणे) असे या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून ५९२ ग्रॅम गांजा, ज्याची अंदाजे किंमत २९ हजार ६०० रुपये आहे, तसेच गांजा विक्रीतून मिळालेली १ हजार ३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

२४ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३चे पथक सिंहगड रोड, नऱ्हे, नांदेड सिटी, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाहिजे आरोपींचा शोध, अवैध धंद्यांची तपासणी आणि गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. यावेळी पथक वारजे येथील अभिनव भारत सोसायटीजवळ आले असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार तुषार किंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सुनीता भाट ही गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी पथकासह संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. बातमीदाराने दिलेल्या वर्णनाची महिला तेथे आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने आपले नाव सुनीता सिकंदर भाट असल्याचे सांगितले.

तिच्याकडे तपासणी केली असता ५९२ ग्रॅम गांजा आणि विक्रीतून मिळालेली १ हजार ३०० रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून तिच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी तिला वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुनीता भाट हिच्याविरुद्ध यापूर्वीही अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार अर्चना वाघमारे, किशोर शिंदे, कैलास लिमण, काटकर, मनोज पवार, अमित बोडरे, आशिष राठोड, योगेश झेंडे, तुषार किंद्रे आणि विपुल गायकवाड यांनी ही कारवाई केली.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper