મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

वंचितांच्या दिवाळीत ‘द पुना मर्चंट चेंबर्स’ने फुलविला आनंदाचा गोडवा

धाराशिवमधील गरजू कुटुंबे, आदिवासी समाजबांधव आणि पालावरच्या शाळांतील विद्यार्थ्यांना लाडू-चिवड्याचे वाटप

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

वंचितांच्या दिवाळीत ‘द पुना मर्चंट चेंबर्स’ने फुलविला आनंदाचा गोडवा
धाराशिवमधील गरजू कुटुंबे, आदिवासी समाजबांधव आणि पालावरच्या शाळांतील विद्यार्थ्यांना लाडू-चिवड्याचे वाटप

पुणे : दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि वंचितांच्या आयुष्यातही सणाचा गोडवा फुलावा, या सामाजिक बांधिलकीतून पुण्यातील ‘द पुना मर्चंट चेंबर्स’च्या वतीने धाराशिव परिसरात दिवाळी फराळ वाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दुष्काळग्रस्त, गरीब व गरजू कुटुंबांसह पालावरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लाडू आणि चिवड्याचे वाटप करण्यात आले.

राघुचीवाडी येथील शेतमजूर व गरीब कुटुंबे, येडशी येथील आदिवासी राजगोंड समाजवस्ती तसेच धाराशिव शहरातील सांजा चौक परिसरातील कुडमूडे (पांगुळ) जोशी समाजाच्या पालावरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ देण्यात आला. आर्थिक अडचणींमुळे सणाचा आनंद मर्यादित राहणाऱ्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे आनंद फुलला.

‘द पुना मर्चंट चेंबर्स’तर्फे दरवर्षी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दलाराम चौधरी, बन्सी करपे, हनुमान बिष्णोई, जितेंद्र चौधरी आणि परशुराम कोल्हे यांची यावेळी उपस्थिती होती. राघुचीवाडी येथील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

पालावरच्या शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर यांनी विशेष सहकार्य केले. प्रयोगशील शिक्षक व बालसाहित्यकार समाधान शिकेतोड यांनी उपक्रमाचे समन्वयन केले.

वंचित घटकांच्या सणात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि वाटून घेण्याच्या संस्कृतीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

શેર કરો