મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

रोहित पवारांना अजितदादांची जागा घेण्याची घाई; हसन मुश्रीफ यांचा टोला, सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचे केले समर्थन

ट्रॅक्टर मोर्चावरून राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदांची चर्चा; रोहित पवार पक्षाला विश्वासात घेत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार असल्याचा मुश्रीफ यांचा दावा

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

मंत्री हसन मुश्रीफ
मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक राजकीय भूमिकेमुळे पक्षांतर्गत मतभेद उघड होऊ लागल्याचे चित्र आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा रोहित पवार यांनी केली आहे. मात्र, या मोर्चावरून खासदार सुप्रिया सुळे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर भाष्य करत त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

मुश्रीफ म्हणाले, “रोहित पवार ज्या पद्धतीने आक्रमकपणे काम करत आहेत, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा देणाऱ्या सुप्रिया ताईंच्या भूमिकेला त्यांचा विरोध आहे. प्रत्येक आंदोलन करताना पक्षाला विश्वासात घेतले जात नाही, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय असल्याने त्यावर मी बोलणे उचित ठरणार नाही.”

‘अजितदादांची जागा घेण्याची घाई’

रोहित पवार यांना अजित पवार यांची जागा घेण्याची घाई झाली आहे का, असा प्रश्न मुश्रीफ यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी रोहित पवारांच्या राजकीय वाटचालीवर भाष्य केले. “पूर्वी ते आमच्या पक्षावर टीका करत होते. त्यामुळे उत्तर देताना आम्ही अजित पवारांची जागा घेण्याची त्यांना घाई झाली आहे, असे म्हणायचो. आता ज्या पद्धतीने ते पुढे येत आहेत आणि स्वतःसाठी राजकीय स्पेस निर्माण करत आहेत, त्यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो,” असे मुश्रीफ म्हणाले.

सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचे समर्थन

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मुश्रीफ यांनी समर्थन केले. ते म्हणाले, “सुप्रिया ताई डिलिमिटेशनला पाठिंबा देत असतील, तर त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. त्यांचा मतदारसंघ एवढा मोठा आहे की, पाच वर्षांत प्रत्येक गावात जाणेही शक्य होत नाही. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास लोकप्रतिनिधींना नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येईल. आमचेही विधानसभेचे मतदारसंघ मोठे आहेत. कागलपासून आजऱ्यापर्यंतचा परिसर पाहता मतदारसंघाचा विस्तार किती मोठा आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सुप्रिया ताईंची भूमिका स्वागतार्ह आहे.”

अंजली आंबेडकरांच्या आरोपावरही दिले उत्तर

दरम्यान, अंजली आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भाजपविषयक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यास वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटले जाते; मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्यास त्यांच्यावर अशी टीका का होत नाही, असा सवाल त्यांनी केला होता.

या आरोपावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले, “एका विशिष्ट प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.” अशा शब्दांत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

एकूणच, रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या मतभेदांच्या चर्चेला हसन मुश्रीफ यांच्या विधानामुळे आणखी धार आली आहे. विशेषतः सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे समर्थन करताना रोहित पवारांच्या आक्रमक राजकारणावर त्यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरत आहे.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર