મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

राष्ट्रवादीत पडद्यामागे मोठ्या हालचाली? सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत भेट

विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग; सुनेत्रा पवार यांनीही घेतली आमदारांची बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

સક
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

राष्ट्रवादीत पडद्यामागे मोठ्या हालचाली?
खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना एकीकडे वेग आला असतानाच दुसरीकडे स्वतंत्र गट म्हणून सत्तेत सहभागी होण्याच्या पर्यायाचीही चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून मुंबईपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांमध्ये सुमारे ३५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, दोन्ही गटांमधील संभाव्य राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीत त्यांनी शरद पवार यांच्याकडून आमदारांना फोन येत आहेत का, अशी विचारणा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये संवाद सुरू आहे का आणि विलिनीकरणाबाबत काही ठोस हालचाली होत आहेत का, याची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांकडून विलिनीकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या संदर्भात अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेतील आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका अजित पवार गटातील काही आमदारांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे विलिनीकरणाचा पर्याय अद्याप चर्चेत असल्याचे चित्र आहे.

यातच पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अजित पवार गटातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांनाही पुन्हा हवा मिळाली आहे.

एकीकडे विलिनीकरणाची चर्चा, दुसरीकडे स्वतंत्रपणे सत्तेत सहभागी होण्याचा पर्याय आणि त्यातच प्रमुख नेत्यांच्या बैठका यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकांमधून कोणता राजकीय निर्णय आकाराला येतो आणि सुनेत्रा पवार यांची भूमिका काय असते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

શેર કરો
સક

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर