राज्यातील ८७ टक्के विहिरींची पाणीपातळी घटली
भूजलसाठ्याची चिंता वाढली
2 મિનિટ વાંચન

नागपूर : राज्यातील भूजलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली असून, तब्बल ८७ टक्के निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या निरीक्षणानुसार, राज्यातील ३ हजार ८१६ निरीक्षण विहिरींपैकी ३ हजार ३२१ विहिरींमध्ये भूजलपातळीत घट नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ९६४ विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घसरण झाली आहे. मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही भूजलसाठ्यावरील ताण वाढत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
विभागनिहाय आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक ८६२ निरीक्षण विहिरींमध्ये भूजलपातळी घटली आहे. त्यापैकी ५९४ विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घसरण नोंदविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात ६५० विहिरींची पाणीपातळी खालावली असून, १६० विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात ५५८ विहिरींमध्ये पातळी घटली असून, त्यापैकी ११७ विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घसरण आहे.
विदर्भातील अमरावती विभागात ५३१ विहिरींमध्ये भूजलपातळी घटली आहे. त्यापैकी ६६ विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घसरण झाली आहे. नागपूर विभागातील ५३० विहिरींमध्ये पातळी खालावली असून, १८ विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घट नोंदविण्यात आली आहे. कोकण विभागातील १९० विहिरींची पाणीपातळी घटली असून, त्यापैकी नऊ विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घसरण झाली आहे.
भूजलपातळीत घट नोंदविणाऱ्या निरीक्षण विहिरींची संख्या २०१५ मध्ये २ हजार २४६ होती. सप्टेंबर २०२६ अखेर ही संख्या ३ हजार ३२१ वर पोहोचली आहे. म्हणजेच अकरा वर्षांत अशा विहिरींच्या संख्येत १ हजार ७५ ने वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात २०१५ मध्ये ३६२ विहिरींमध्ये पाणीपातळी घटली होती. आता ही संख्या ६५० झाली आहे. नागपूर विभागात २७९ वरून ५३०, तर अमरावती विभागात २९८ वरून ५३१ पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे भूजलावरील वाढता ताण केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित नसून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही त्याची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येते.
पाणी व्यवस्थापनाचे नियोजन आवश्यक
भूजलपातळीतील घसरण रोखण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे, भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविणे आणि विहिरी तसेच बोअरवेलमधून होणाऱ्या पाण्याच्या उपशाचे नियोजन करणे आवश्यक आहे. आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
