मेट्रो स्थानकांच्या नामकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुंबई, पुणे आणि नागपूरमधील मेट्रो स्थानकांच्या नावांबाबत होणार निर्णय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह-अध्यक्षपदी
1 મિનિટ વાંચન

मुंबई, महाराष्ट्र मिरर : मुंबई, पुणे आणि नागपूर शहरांमधील मेट्रो स्थानकांच्या नामकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या शहरांमधील मेट्रो स्थानकांना नवीन नावे देणे तसेच काही स्थानकांच्या विद्यमान नावांमध्ये बदल करण्याबाबत शिफारशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सह-अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मेट्रो स्थानकांच्या नामकरणाबाबत विविध स्तरांवरून मागण्या आणि सूचना करण्यात येत होत्या. स्थानिक ऐतिहासिक वारसा, महापुरुषांचे योगदान, संबंधित परिसराची ओळख आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन स्थानकांची नावे निश्चित करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती मुंबई, पुणे आणि नागपूरमधील मेट्रो स्थानकांच्या नामकरणासंदर्भातील प्रस्तावांचा अभ्यास करणार आहे. तसेच विद्यमान नावांमध्ये बदल करण्याच्या मागण्यांचाही विचार करून शासनाला शिफारशी सादर करणार आहे. या समितीच्या शिफारशींनंतर मेट्रो स्थानकांच्या नामकरणाबाबत पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील तीन प्रमुख शहरांमधील मेट्रो स्थानकांच्या नावांमध्ये आगामी काळात बदल होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
