भारतीय युवा संघाने ऐतिहासिक विजय मिळवत जिंकला १९ वर्षांखालील आशिया चषक
मोहित उल्वा ठरला विजयाचा शिल्पकार
3 મિનિટ વાંચન

अल अमेरात (ओमान) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने ऐतिहासिक विजय मिळवत १९ वर्षांखालील आशिया चषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक लढतीत भारताने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले ३३८ धावांचे विशाल लक्ष्य भारताने नऊ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भारताने विक्रमी नवव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
भारताच्या विजयाचा खरा नायक ठरला तो मोहित उल्वा. त्याने अवघ्या २६ चेंडूंत नाबाद ४९ धावांची तुफानी खेळी केली. विशेष म्हणजे, शेवटच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना मोहितने लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला सी. व्यंकटाने नाबाद ११ धावा करत मोलाची साथ दिली.
रायचंदानी आणि सेहवागची दमदार सुरुवात
३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. रायचंदानीने ८० धावांची, तर सेहवागने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, सेहवाग बाद झाल्यानंतर रायचंदानी आणि अन्वय द्रविड (१९) हेही लागोपाठ बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला.
४२व्या षटकात भारताची अवस्था आठ बाद २५२ अशी झाली होती. अशा परिस्थितीत मानल चौहानने ३२ चेंडूंत ४७ धावा करत मोहितसोबत नवव्या विकेटसाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मानल बाद झाल्यानंतर भारताला विजयासाठी ३६ धावांची गरज होती आणि हातात केवळ एक विकेट शिल्लक होती. मात्र, मोहितने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मिलाफ साधत व्यंकटाच्या साथीने विजय खेचून आणला.
पाकिस्तानकडून उस्मानचे शानदार शतक
तत्पूर्वी, नाणेफेकीनंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने नऊ विकेट्स गमावत ३३७ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर उस्मान खानने १०७ धावांची शानदार खेळी केली. त्याने अब्दुल कादिरसोबत दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या १८ षटकांत १३५ धावांची भागीदारी केली. कादिरने ५४ चेंडूंत ८० धावा फटकावल्या. त्याने अवघ्या ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफनेही ६० धावांचे योगदान दिले.
भारताकडून काव्या पटेलने ६८ धावा देत चार विकेट्स मिळवल्या, तर सी. व्यंकटाने ४० धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडले. पाकिस्तानने दिलेले मोठे आव्हान भारतीय फलंदाजांनी अखेरच्या क्षणी पूर्ण करत ऐतिहासिक विजय साकारला.
'आजचा दिवस माझाच आहे', मोहितचा आत्मविश्वास
विजयानंतर मोहित उल्वाने आपल्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. कठीण परिस्थितीतही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असल्याचे त्याने सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना तो म्हणाला, "शेवटच्या षटकात माझा देवावर विश्वास होता. मी स्वतःला अष्टपैलू खेळाडू मानतो. ही स्पर्धा माझ्यासाठी फारशी चांगली गेली नव्हती; मात्र आजच्या दिवशी मी नक्कीच चांगली कामगिरी करू शकेन, असा मला विश्वास होता."
"आजचा दिवस माझाच आहे आणि मी माझ्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणार, हे मला माहीत होते. १० क्रमांक माझ्यासाठी नेहमीच भाग्यवान ठरला आहे. माझ्या धावा याच क्रमांकावर फलंदाजी करताना आल्या आहेत," असेही त्याने सांगितले. कठीण परिस्थितीत साथ दिल्याबद्दल त्याने मानल चौहानचे विशेष आभार मानले.
आर्यवीर सेहवाग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
भारताचा सलामीवीर आर्यवीर सेहवागला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. त्याने पाच सामन्यांत तीन अर्धशतके आणि एका शतकासह एकूण ३६१ धावा केल्या. अंतिम सामन्यात कोपराला दुखापत झालेली असतानाही त्याने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
सामन्यानंतर भावना व्यक्त करताना सेहवाग म्हणाला, "आता माझ्या हातात कोणतीही वेदना जाणवत नाही. मी जे पाहिले त्यावर अजूनही विश्वास बसत नाही. अंगावर रोमांच उभे राहत आहेत. भारत-पाकिस्तान सामना असला की भावना नेहमीच तीव्र असतात. मागील सामन्यात मी पाकिस्तानविरुद्ध लवकर बाद झालो होतो. त्यामुळे आज दुखापत झाली तरी धावा करण्याचा निर्धार केला होता."
भारताच्या युवा खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेला आत्मविश्वास, जिद्द आणि विजयासाठीची झुंज यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आणखी एका ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी मिळाली.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
