पुणे मनपा, पीएमआरडीए हद्दीतील सर्वच डोंगरांवर आता 'बीडीपी' आरक्षण?
हिल टॉप-हिल स्लोप क्षेत्राचे जैवविविधता उद्यानात रूपांतर करण्याची उच्चस्तरीय समितीची शासनाला शिफारस; एकसमान धोरण लागू होणार
2 મિનિટ વાંચન

पुणे: पुणे महापालिका (मनपा) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील डोंगर व टेकड्यांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारी शिफारस केली आहे. पुणे शहर तसेच पीएमआरडीए क्षेत्रातील सध्याच्या 'डोंगरमाथा व डोंगरउतार' (हिल टॉप-हिल स्लोप झोन) क्षेत्राचे थेट 'जैवविविधता उद्यान' (बीडीपी) आरक्षणात रूपांतर करण्यात यावे, असा अहवाल समितीने राज्य शासनाला सादर केला आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यास पुणे आणि परिसरातील सर्वच डोंगरांना कायदेशीर संरक्षणाचे एकसमान कवच प्राप्त होणार आहे.
पुणे शहर आणि परिसरातील डोंगरमाथा व उताराच्या जमिनींबाबत सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) तयार करण्यासाठी राज्य शासनाने गतवर्षी माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली सहा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित केली होती. या समितीने सर्व तांत्रिक, भौगोलिक आणि कायदेशीर बाजूंचा सखोल अभ्यास करून आपला अंतिम अहवाल नुकताच शासनाला सुपूर्द केला आहे. त्यामध्ये महापालिका आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील सर्वच डोंगरमाथे व उतारांवर 'बीडीपी' आरक्षण लागू करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आली आहे.
सध्या पुणे शहराच्या जुन्या हद्दीत आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये डोंगरांच्या आरक्षणाबाबत मोठी तफावत आहे. पुणे शहराच्या १९८७ च्या मंजूर विकास आराखड्यात (डीपी) डोंगरमाथा आणि डोंगरउतार क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार या भागात केवळ ०.४ टक्के इतक्याच मर्यादित बांधकामाला परवानगी होती. मात्र, जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याच्या पुनर्रचना प्रक्रियेत डोंगरमाथा व उतारावरील आरक्षणाचा निर्णय अद्याप शासनाकडे प्रलंबित आहे.
दुसरीकडे, महापालिकेत १९९९ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील डोंगरमाथा व उतारावर पूर्णपणे 'बीडीपी' आरक्षण टाकण्यात आले आहे. तसेच, पीएमआरडीएच्या हद्दीतील डोंगरांवर 'हिल टॉप-हिल स्लोप झोन' प्रस्तावित करण्यात आला असला, तरी त्याबाबत अद्याप अंतिम व ठोस धोरण निश्चित झालेले नाही. या धोरणात्मक विसंगतीमुळे बांधकाम परवानग्या आणि पर्यावरणाच्या नियमनाबाबत मोठी संदिग्धता निर्माण झाली होती.
उच्चस्तरीय समितीने आपल्या अहवालात या विसंगतीवर बोट ठेवले आहे. पुणे शहराची जुनी हद्द, समाविष्ट गावे आणि पीएमआरडीए क्षेत्रातील डोंगर व टेकड्यांचे भौगोलिक स्वरूप आणि पर्यावरणीय महत्त्व एकसारखेच आहे. असे असताना एकाच शहरातील आणि लगतच्या परिसरातील डोंगरांसाठी वेगवेगळे निकष किंवा आरक्षणे ठेवणे शास्त्रीय व पर्यावरणीयदृष्ट्या योग्य नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे पुण्याच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात या टेकड्यांची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. त्यामुळेच जुन्या हद्दीतील प्रलंबित 'हिल टॉप-हिल स्लोप' झोन आणि पीएमआरडीए हद्दीतील डोंगरांचे क्षेत्र एकत्रित करून त्यावर सरसकट 'बीडीपी' आरक्षण लागू करावे, अशी शिफारस समितीने केली आहे. राज्य शासन या अहवालावर नेमका काय निर्णय घेते, याकडे आता पुणेकरांसह पर्यावरणप्रेमींचे आणि बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
