‘पुढचा बॉम्ब टाकल्यावर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल’; संजय राऊतांचा फडणवीसांना थेट इशारा
एसआरएच्या ३०० प्रकल्पांमध्ये ४० हजार कोटींच्या घोटाळ्याचा दावा; लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत
2 મિનિટ વાંચન

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा देत खळबळजनक विधान केले आहे. “मी जेव्हा पुढचा बॉम्ब टाकेन, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल,” असा दावा राऊत यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच, लवकरच आणखी एक मोठा खुलासा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसआरए घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) कथित घोटाळ्यावरून राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांकडून मर्जीतील बिल्डरांना संरक्षण दिले जात असल्याने या प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्राद्वारे बिल्डरांकडून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या नावाने दबाव आणला जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचेही राऊत म्हणाले.
३०० प्रकल्पांमध्ये ४० हजार कोटींच्या घोटाळ्याचा दावा
मुंबईतील अनेक उच्चभ्रू भागांमध्ये झोपडपट्ट्या नसतानाही झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प दाखवण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. अशा प्रकारचे सुमारे ३०० प्रकल्प असून, त्यामध्ये तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून, एसआरएतील अधिकाऱ्यांवर दबाव आणून संपूर्ण व्यवहार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील आणखी काही बाबी लवकरच समोर आणणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
‘नैतिकता असती तर प्रकल्पांना स्थगिती दिली असती’
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, नैतिकता असलेले मुख्यमंत्री असते, तर त्यांनी या ३०० प्रकल्पांना स्थगिती दिली असती. तसेच, अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीबाबतही मुख्यमंत्र्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी, “ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत. जैसा नरेंद्र, वैसा देवेंद्र,” अशा शब्दांत टीका केली.
दरम्यान, संजय राऊत यांच्या ‘पुढच्या बॉम्ब’च्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी नेमका कोणता खुलासा करणार आणि त्याचा राज्य सरकारवर काय परिणाम होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, एसआरए घोटाळ्याबाबत राऊत यांनी केलेले आरोप अद्याप आरोपांच्या स्वरूपात असून, त्यावर सरकार किंवा संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

મહારાષ્ટ્ર મિરર
