पालघरच्या प्रकल्पावरून महायुतीत वादाची ठिणगी! गणेश नाईकांना उदय सामंतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘माझे नेते एकनाथ शिंदे’
‘माझ्या विभागात काय निर्णय घ्यायचे, हे मी आणि माझी प्रशासकीय टीम ठरवेल’; पत्रकार परिषद घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा सामंतांचा नाईकांना सल्ला
2 મિનિટ વાંચન

मुंबई : पालघरमधील प्रस्तावित भादवे-उसरणी एमआयडीसी प्रकल्पावरून महायुतीमधील दोन मंत्र्यांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पाची माहिती सर्वप्रथम पालकमंत्र्यांना मिळायला हवी, असे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझ्या विभागात काय करायचे, हे मी आणि माझी प्रशासकीय टीम ठरवेल. माझे नेते एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आहेत,’ असे स्पष्ट करत सामंत यांनी नाईक यांना थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
काय म्हणाले उदय सामंत?
गणेश नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, गणेश नाईक यांच्याकडे वनविभाग आहे. त्यांच्या विभागात काय सुरू आहे, याची माहिती त्यांनी मला द्यावी, अशी माझी अपेक्षा नाही. त्याचप्रमाणे माझ्या विभागात काय निर्णय घ्यायचे, हे मी ठरवणार आहे. माझ्या विभागासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माझे नेते एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना माहिती देणे ही माझी जबाबदारी आहे. प्रत्येक मंत्रालयातील निर्णयाची माहिती प्रत्येक मंत्र्याला देण्याची कोणतीही व्यवस्था मंत्रालयात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना सामंत यांनी गणेश नाईक यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. गणेश नाईक हे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐकू शकतात. त्यांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या शंका मांडाव्यात, असे सामंत म्हणाले.
प्रकल्पाला विरोध असल्याने प्रश्न निर्माण
भादवे-उसरणी एमआयडीसी प्रकल्पाला काही ठिकाणी विरोध होत असल्याने या प्रकल्पाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले. माझ्या विभागात काय चालले आहे आणि कोणते निर्णय घ्यायचे, हे संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रशासकीय टीम ठरवेल. मी अनुभवाने आणि वयानेही गणेश नाईक यांच्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाबाबतच्या शंका मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दूर कराव्यात, असा टोलाही सामंत यांनी लगावला.
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यावरही भाष्य
दरम्यान, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ओमराजे निंबाळकर काय बोलले, यापेक्षा आमच्या पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. आमच्या पक्षात जिल्हा परिषद, आमदारकी आणि खासदारकीसंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. पक्षाच्या धोरणाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांचाच आहे. हा निर्णय उदय सामंत घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

મહારાષ્ટ્ર મિરર
