चंद्रपुरात वाघांच्या हल्ल्यांत तीन वर्षांत ९१ मृत्यू
जंगलावरील मानवी अवलंबित्व आणि अधिवासातील अडथळे प्रमुख कारणे - महाराष्ट्रात ४४४ वाघ
2 મિનિટ વાંચન

चंद्रपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्रात वाघांची संख्या ४४४ वर पोहोचली असली, तरी चंद्रपुरात मानव-वाघ संघर्षाने गंभीर रूप धारण केले आहे. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांत वाघांच्या हल्ल्यांत तब्बल ९१ जणांना जीव गमवावा लागला असून, त्यापैकी ४७ मृत्यू एकट्या २०२५ मधील आहेत. जंगलावरील मानवी अवलंबित्व, वाघांची वाढती घनता आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक मार्गांमधील अडथळे यामुळे मानव-वाघ संघर्ष वाढला आहे.
राज्यातील अन्य पाच व्याघ्र प्रकल्पांमध्ये गेल्या तीन वर्षांत वाघांच्या हल्ल्यांत मिळून केवळ १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पेंचमध्ये तीन ते चार, मेळघाट आणि नवेगाव-नागझिरा येथे प्रत्येकी दोन ते तीन, तर बोरमध्ये एक ते दोन मृत्यू नोंदवले गेले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात या कालावधीत वाघांच्या हल्ल्यामुळे एकही मृत्यू झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन, सरपण आणि चारा गोळा करणे तसेच शेतीकामासाठी नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. जंगलावर अवलंबून असलेल्या या दैनंदिन व्यवहारांमुळे नागरिकांचा वाघांशी सामना होण्याची शक्यता वाढते. याशिवाय वाघांची वाढती घनता, मर्यादित वनक्षेत्र आणि अधिवासातील बदल यांचाही संघर्षात वाटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि त्याच्या बफर क्षेत्रात वाघांची संख्या ११० पेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. मेळघाटात ४५ ते ५०, पेंचमध्ये ६५ ते ७०, तर नवेगाव-नागझिरा आणि बोरमध्ये प्रत्येकी १५ ते २० वाघ असल्याचे सांगण्यात आले आहे. सह्याद्री परिसरात वाघांची संख्या एक ते दोन आहे.
कोळसा खाणी, अतिक्रमण आणि अन्य मानवी हस्तक्षेपांमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक मार्ग खंडित होत आहेत. त्यामुळे वाघांच्या हालचालींवर मर्यादा येऊन त्यांचा मानवी वस्त्यांशी संपर्क वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. जंगलातील इंधन, मोहफुले, बांबू आणि तेंदूपत्ता यांसारख्या संसाधनांसाठी नागरिकांचे जंगलावरील अवलंबित्वही संघर्षाचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे.
सातपुडा फाउंडेशनचे उपसंचालक मंदार पिंगळे यांच्या मते, वाघांची अधिक घनता, वन्यजीव मार्गांमधील अडथळे आणि जंगलावरील मानवी अवलंबित्व यामुळे वाघ मानवी वस्त्यांच्या दिशेने येण्याच्या घटना वाढतात. हा संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार वाघांचे स्थलांतर आणि स्थानिक नागरिकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे.

મહારાષ્ટ્ર મિરર
