મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

गोधरा रेल्वे अग्निकांडातील दोषीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

१८ वर्षांनंतर वैद्यकीय कारणास्तव दिलासा; गंभीर हृदयविकाराने त्रस्त इरफान पाडाची जन्मठेप स्थगित

સ્મિતા કુલકર્ણી
સ્મિતા કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

गोधरा रेल्वे अग्निकांड
गोधरा रेल्वे अग्निकांड

नवी दिल्ली : २००२ मधील गोधरा रेल्वे अग्निकांड प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या इरफान सिराज पाडा याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. २३) मोठा दिलासा दिला. गंभीर हृदयविकाराने त्रस्त असलेल्या पाडाची वैद्यकीय स्थिती आणि त्याने कारागृहात घालवलेला दीर्घ कालावधी लक्षात घेऊन न्यायालयाने त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

इरफान पाडा याने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याला गंभीर हृदयविकार असून, त्याच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. पाडाने आतापर्यंत १८ वर्षे तीन महिने कारागृहात घालवले असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली.

सरकारी पक्षानेही वैद्यकीय स्थिती मान्य केली

सुनावणीदरम्यान गुजरात सरकारच्या वतीने सरकारी वकील स्वाती घिल्डियाल यांनी बाजू मांडली. गोधरा अग्निकांड हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दोषीच्या कारागृहातील वर्तनाबाबतही सरकारने काही आक्षेप नोंदवले. २०१९ मध्ये पॅरोलवर सुटल्यानंतर तो निर्धारित मुदतीत कारागृहात परतला नव्हता आणि तब्बल ३७२ दिवस फरार राहिला होता, अशी माहिती सरकारी पक्षाने दिली.

मात्र, पाडाच्या आरोग्यविषयक स्थितीबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीमध्ये तथ्य असल्याचे सरकारने मान्य केले. वैद्यकीय कारणास्तव शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीला सरकारचा विरोध नसल्याची भूमिका मांडण्यात आली. यानंतर न्यायालयाने त्याच्या वैद्यकीय स्थितीचा विचार करून शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

काय आहे गोधरा रेल्वे अग्निकांड?

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोधरा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावण्यात आली होती. या घटनेत ५९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अयोध्येहून परतणाऱ्या कारसेवकांचा समावेश होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली उसळल्या. या प्रकरणाच्या तपासानंतर अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती.

मार्च २०११ मध्ये विशेष न्यायालयाने या प्रकरणात ३१ जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी ११ जणांना फाशीची, तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने ११ जणांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली आणि इतर २० जणांची जन्मठेप कायम ठेवली होती.

शिक्षा स्थगित म्हणजे निर्दोष मुक्तता नाही

सर्वोच्च न्यायालयाने इरफान पाडाला दिलेला दिलासा हा वैद्यकीय कारणांवर आधारित आहे. न्यायालयाने त्याची दोषसिद्धी रद्द केलेली नाही किंवा त्याला निर्दोष घोषित केलेले नाही. केवळ जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देऊन जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गोधरा अग्निकांड प्रकरणातील त्याच्यावरील दोषसिद्धी कायम आहे.

શેર કરો
સ્મિતા કુલકર્ણી

રિપોર્ટર-સબએડિટર

મહારાષ્ટ્ર મિરર