મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

औद्योगिक कामगारांसाठी पीएमपीच्या विशेष बस; तीन शिफ्टमध्ये धावणार गाड्या!

गर्दी नसलेल्या वेळेचा होणार वापर; चाकणसह मोठ्या औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांशी चर्चा सुरू

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

औद्योगिक कामगारांसाठी पीएमपीच्या विशेष बस; तीन शिफ्टमध्ये धावणार गाड्या!
गर्दी नसलेल्या वेळेचा होणार वापर; चाकणसह मोठ्या औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांशी चर्चा सुरू

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगार आणि कर्मचाऱ्यांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होण्याची शक्यता आहे. कंपन्यांच्या कामाच्या वेळा आणि कामगारांच्या शिफ्ट लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) विशेष बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सकाळी, दुपारी आणि रात्री अशा तीन शिफ्टच्या वेळेनुसार या बस धावणार आहेत. विशेष म्हणजे, शहरातील नियमित मार्गांवर प्रवाशांची गर्दी कमी असलेल्या वेळेत या बस सोडण्याचा विचार आहे. त्यामुळे उपलब्ध बसगाड्यांचा अधिक प्रभावी वापर होण्याबरोबरच कामगारांना सुरक्षित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये बहुतांश कंपन्यांचे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालते. सकाळी सहा, दुपारी तीन आणि रात्री दहा या वेळांना कामगारांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते. मात्र, याच वेळेत शहरातील अनेक नियमित मार्गांवर पीएमपी बसला तुलनेने कमी प्रवासी मिळतात. परिणामी, काही बस आगारांमध्ये किंवा थांब्यांवर उभ्या असतात. या उपलब्ध बसगाड्यांचा औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसाठी उपयोग करण्याची संकल्पना पीएमपी प्रशासनाकडून पुढे आणली जात आहे.

मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पीएमपीएमएल प्रशासनाने प्राथमिक तयारी सुरू केली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अन्य मोठ्या औद्योगिक क्षेत्रांमधील कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली जात आहे. संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्या कामाच्या शिफ्ट, तसेच कर्मचारी वास्तव्यास असलेल्या भागांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानुसार बसमार्ग आणि थांबे निश्चित करण्याचे नियोजन आहे.

कंपन्यांना आणि कामगारांनाही होणार फायदा

सध्या अनेक कामगारांना कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी खासगी वाहने, दुचाकी किंवा कंपनीच्या स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. विशेषतः रात्रीच्या शिफ्टमध्ये घरी परतताना वाहतुकीची अडचण निर्माण होते. पीएमपीची विशेष बससेवा सुरू झाल्यास कामगारांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचे नियोजन करणे सोपे होऊ शकते. दुसरीकडे, कमी गर्दीच्या वेळेत बसगाड्यांचा वापर वाढल्याने पीएमपीच्या प्रवासी संख्येत आणि उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतुकीची गरज लक्षात घेऊन विशेष बससेवेचे नियोजन केले जात आहे. कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून कर्मचारी संख्या, शिफ्टच्या वेळा आणि त्यांच्या निवासस्थानांच्या परिसराची माहिती घेतली जाईल. त्यानुसार व्यवहार्य बसमार्ग निश्चित करण्यात येतील. उपलब्ध बसगाड्यांचा योग्य वापर करून प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. नागेश गायकवाड जनसंपकर् अधिकारी पीएमपीएमएल

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper