મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

एफसी रोड अतिक्रमण

सत्ताधाऱ्यांचा प्रशासनाला घरचा आहेर

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

4 મિનિટ વાંચન

एफसी रोड अतिक्रमण
सत्ताधाऱ्यांचा प्रशासनाला घरचा आहेर

वैशाली आणि रूपाली हॉटेलवरील कारवाईनंतर मुख्य सभेत सत्ताधारी भाजप नगरसेवकांचे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप

महत्वाचे मुद्दे

*फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता हा पुणे शहराचा आदर्श आणि मुख्य रस्ता मानला जातो. मात्र सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे पदपथ, फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिन अनधिकृत स्टॉल्सनी पूर्णपणे व्यापले आहेत

*फर्ग्युसन रोड हा 'नो-हॉकर्स झोन' असतानाही तिथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण

*सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही पादचाऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत

*वॉर्ड ऑफिसचे अधिकारी विभुते यांच्यासह इतरांना व्हॉट्सॲप ग्रुपवर नागरिकांच्या तक्रारी दिसूनही कोणतीही कारवाई केली जात नाही

*व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या ओळखपत्रांची आणि पार्श्वभूमीची तपासणी करण्याची जोरदार मागणी

पुणे: पुणे शहराला वाहतुक कोंडीसह अतिक्रमणाचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा कारवाई करुनदेखील पथारी व्यावसायीक पुन्हा आपले ठाण आहे त्याच जागी मांडताना दिसताता त्यामुळे व्यावसायिकांना नेमकं कोण अभय देते हा प्रश्न पुणेकरांना उपस्थित झाला आहे. विशेष बाब म्हणजे नुकतचे एफडीएने वैशाली आणि रुपाली हॉटेलवर कारवाई करत लायसन्स जप्त केले. या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेत झालेल्या मुख्य सभेत सत्ताधाऱ्यांनी एफसी रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनालाच घरचा आहेर दिला.

नगरसेवक धीरज घाटे यांच्यासह भाजपच्या इतर नगरसेवकांनी हा मुद्दा सभागृहात मांडत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता हा पुणे शहराचा आदर्श आणि मुख्य रस्ता मानला जातो. मात्र सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे पदपथ, फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिन अनधिकृत स्टॉल्सनी पूर्णपणे व्यापले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही पादचाऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत, अशा शब्दांत नगरसेवकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर आसूड ओढला. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेतही हा अतिक्रमणाचा विळखा पुणे शहराला लागलेला कॅन्सर असल्याचे म्हटले होते, तरीही प्रशासन हलत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

कारवाईनंतर अवघ्या पाच मिनिटांत पुन्हा तेच स्टॉल्स

चर्चेत सहभागी होताना नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. अतिक्रमण विभागाची गाडी एफसी रोडवर उभी असतानाही अधिकारी गाडीत बसून केवळ मोबाइलवर व्हिडिओ पाहत असतात, मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करत नाहीत. कारवाई झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत पुन्हा तेच स्टॉल्स उभारले जातात आणि शंभर-शंभर रुपयांत कपडे विकणारे विक्रेते पुन्हा रस्ता अडवतात, अशी तक्रार नगरसेवकांनी केली. घोल रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या भिंतीवरून कर्मचारी रात्रीच्या वेळी विक्रेत्यांना सामान पुरवत असल्याचा व्हिडिओ पुरावा सभागृहात सादर करण्यात आला. तसेच, एफसी रोड ते आपटे रोडला जोडणाऱ्या व्हिनस लेनमध्येही अरुंद रस्त्यावर अतिक्रमण असून वॉर्ड ऑफिसचे अधिकारी विभुते यांच्यासह इतरांना व्हॉट्सॲप ग्रुपवर नागरिकांच्या तक्रारी दिसूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.

या परिसरात नामवंत महाविद्यालये असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थिनी ये-जा करत असतात. मात्र, काही विक्रेत्यांकडून विद्यार्थिनींकडे वक्रदृष्टीने पाहणे, अश्लील शेरेबाजी करणे आणि चित्रीकरण करण्यासारखे प्रकार घडत असल्याची गंभीर बाब नगरसेविका अपूर्वा खाडे यांच्यासह इतर महिला नगरसेवकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. 'सरप्राईज व्हिजिट'दरम्यान सुरक्षा कर्मचारी एकाच ठिकाणी चहा पीत बसलेले आढळले आणि व्हिजिटला गेलेला अधिकारीही चहा प्यायला गेल्याची धक्कादायक माहिती सभागृहात मांडण्यात आली. या प्रश्नावर खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासोबतही संयुक्त बैठक झाल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले.

बांगलादेशी घुसखोर आणि अस्वच्छतेवरून सभागृहात तीव्र संताप

या चर्चेदरम्यान फर्ग्युसन रोडवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या ओळखपत्रांची आणि पार्श्वभूमीची तपासणी करण्याची जोरदार मागणी नगरसेवक धीरज घाटे यांनी केली आहे. यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही बांगलादेशी नागरिक या ठिकाणी आढळून आले होते, तरीही प्रशासन त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. एका बाजूला अस्वच्छतेच्या कारणावरून वैशाली आणि रूपाली सारख्या नामांकित हॉटेल्सवर तात्काळ कारवाई करून त्यांचा परवाना जप्त केला जातो; मात्र दुसरीकडे रस्त्यावर बसून कचरा करणाऱ्या अनधिकृत पथारी व्यावसायिकांना महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी साफसफाई करून मदत करत असल्याचा विरोधाभास नगरसेवकांनी दाखवून दिला.

“ज्या शेंगा आम्ही खाल्ल्या नाहीत, त्याची टरफले आमचा कार्यकर्ता उचलणार नाही. प्रशासन आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारीच या व्यावसायिकांकडून हप्ते घेत असतील, तर त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी," असे ते म्हणाले.

फर्ग्युसन रोड हा 'नो-हॉकर्स झोन' असतानाही तिथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. बांधकाम विभाग आणि वॉर्ड ऑफिसने संयुक्त पाहणी करून कायमस्वरूपी कारवाई करावी. अतिक्रमणधारकांना पाठिशी घालणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी सत्ताधारी नगरसेवकांनी केली आहे. येत्या एक ते दोन आठवड्यांत एफसी रोडवरील अतिक्रमण पूर्णपणे हटवले नाही, तर सत्ताधारी नगरसेवक स्वतः रस्त्यावर उतरून डेक्कनच्या गुडलक चौकात चक्री उपोषण आणि ठोक मोर्चा काढतील, असा इशारा रवींद्र साळेगावकर, पूजाताई आणि रवीदादा यांच्यासह सर्व नगरसेवकांनी दिला.

विरोधकांचाही सत्ताधाऱ्यांना पाठिंबा

एफसी रोड हा दक्षिण पुणे आणि उत्तर पुणे यांना जोडणारा रस्ता आहे. शनिवारी आणि रविवारी जाण्याासाठी संपूर्ण रस्ता हा ३ ते ४ मिनीटांचा आहे पण अतिक्रमणामुळे अर्धातास लागतो. अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. साईड मार्जिन्समध्ये हॉटेल सुरु आहेत. विशेष म्हणजे, या हॉटेल्सचे पार्किंग कुठे आहे? याची दखल प्रशासनान घेतली आहे का? परवानादेताना या सर्वाचा विचार केला जातो का? असा सवाल विरोधी पक्ष नेते निलेश निकम यांनी यावेळी उपस्थित केला. आयुक्तांना गंभीर दखल घेत पुणे शहराला अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी निकम यांनी यावेळी केली आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper