ई-बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; सोमवारी पुणे आरटीओसमोर एकदिवसीय संप
शहरात ई-बाईक टॅक्सी सेवेला मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
1 મિનિટ વાંચન

पुणे : शहरात ई-बाईक टॅक्सी सेवेला मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सेवेला विरोध दर्शवण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालक संघटना आक्रमक झाल्या असून, ई-बाईक टॅक्सीची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.पुणे जिल्हा रिक्षा चालक-मालक कृती समिती आणि राज्यातील सर्व रिक्षा संघटनांच्या वतीने सोमवारी (दि. २३) सकाळी अकरा वाजता पुणे आरटीओ कार्यालयासमोर एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. या संपात राज्यातील विविध रिक्षा संघटना सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ई-बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची भावना संघटनांनी व्यक्त केली आहे. रिक्षाचालकांना वाहन खरेदी, परवाना, विमा, इंधन आणि देखभालीसाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, कमी दरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक टॅक्सीमुळे रिक्षा व्यवसायासमोर स्पर्धेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.ई-बाईक टॅक्सीला दिलेली परवानगी रद्द करावी, पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायाचे संरक्षण करावे आणि सर्व प्रवासी वाहतूक सेवांसाठी समान नियम लागू करावेत, अशा मागण्या संघटनांकडून करण्यात येत आहेत. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही रिक्षा संघटनांनी दिला आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
