आयपीएलमधील धोनीची खेळाडू म्हणून एक्झिट; आता चेन्नई सुपर किंग्जच्या मार्गदर्शकाची जबाबदारी
भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनी याची आयपीएलमधील खेळाडू म्हणून कारकीर्द अखेर संपुष्टात आली आहे.
1 મિનિટ વાંચન

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनी याची आयपीएलमधील खेळाडू म्हणून कारकीर्द अखेर संपुष्टात आली आहे. चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने त्याच्यावर आता मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नवी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी संघातील खेळाडू कायम ठेवण्याबाबत झालेल्या चर्चेदरम्यान धोनीने स्वतःहून निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्याची माहिती संघाच्या सहमालक रूपा गुरुनाथ यांनी दिली.
वाढते वय आणि सातत्याने जाणवणाऱ्या दुखापती यामुळे गेल्या काही हंगामांमध्ये धोनीचा मैदानावरील सहभाग मर्यादित झाला होता. २०२६ च्या आयपीएल हंगामातही तो एकही सामना खेळण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे त्याच्या आयपीएलमधील खेळाडू म्हणून निवृत्तीबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होती.
दरम्यान, सीएसकेने यासंदर्भात जारी केलेल्या अधिकृत निवेदनात धोनीच्या प्रतिक्रियेचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वी २०२० मध्ये धोनीने सोशल मीडियावर पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता आयपीएलमधील खेळाडू म्हणूनही त्याचा प्रवास थांबणार असून, नव्या भूमिकेत तो संघाला मार्गदर्शन करताना दिसण्याची शक्यता आहे.
धोनीची ओळख असलेली सात क्रमांकाची जर्सीही चेन्नई सुपर किंग्जकडून निवृत्त केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मैदानावर आपल्या नेतृत्वाने आणि खेळाने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या धोनीच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
