आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुणे सज्ज; पॅकेज वनमधील रस्ते कामांची आयुक्तांकडून पाहणी
बाणेर, गणेशखिंड व खडकी भागातील विकासकामांचा आढावा; चेंबर समायोजन, सरळ दुभाजक आणि मेट्रो पिलर रंगरंगोटीचे निर्देश
2 મિનિટ વાંચન

पुणे : आगामी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ या भव्य सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दर्जावाढीसाठी पुणे महानगरपालिकेने कंबर कसली आहे. या स्पर्धेच्या नियोजनातील ‘पॅकेज वन’ अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकासकामांची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सखोल पाहणी केली. कामाचा वेग तातडीने वाढवून फुटपाथसह सर्व संबंधित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी प्रशासकीय यंत्रणांना दिले.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातून जाणारी ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा जानेवारी २०२७ मध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील नामांकित सायकलपटू सहभागी होणार असून, ते अत्यंत वेगाने या मार्गावरून धावणार आहेत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार असणे अनिवार्य आहे. याच अनुषंगाने महापालिकेने संपूर्ण शहरातील स्पर्धा मार्गाचे विविध पॅकेजमध्ये विभाजन करून रस्ते दुरुस्ती व सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. शुक्रवारी आयुक्तांनी बाणेर रस्ता (यशदा ते गणराज चौक), खडकी कॅन्टोन्मेंट परिसर, ब्रेमेन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खडकी रेल्वे स्टेशन ते एबीआयएल चौक आणि गणेशखिंड रस्ता या प्रमुख मार्गांचा दौरा करत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान डांबरीकरणाचा दर्जा, चेंबरची उंची रस्त्याच्या समपातळीत आणण्याचे काम आणि पादचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या फुटपाथच्या कामांची आयुक्तांनी बारकाईने तपासणी केली. सायकल स्पर्धेदरम्यान रस्त्यावरील चेंबर वर-खाली राहिल्यास खेळाडूंच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो; त्यामुळे सर्व चेंबर रस्त्याच्या पातळीनुसार अचूक समायोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, मेट्रो मार्गाखालील रस्त्यावरील दुभाजक एकाच सरळ रेषेत आणून रस्त्याचे स्वरूप अधिक सुटसुटीत आणि सुव्यवस्थित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी मेट्रोच्या पिलरवर आकर्षक रंगरंगोटी करून त्यांचे सुशोभीकरण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते विकासकामे सुरू असताना विविध शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये समन्वय राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या पाहणी दौऱ्याला महापालिकेसह इतर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते. यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) तुषार बाबर, उपायुक्त अविनाश सपकाळ यांच्यासह पथ विभागाचे अभियंते सहभागी झाले होते. याशिवाय पीएमआरडीए , पुणे मेट्रो, पीआयटीसीएमआरएल आणि महावितरण या विभागांचे अधिकारी, कामाचे ठेकेदार मे. गणेश कन्स्ट्रक्शन तसेच तज्ज्ञ सल्लागार पेवटेक कंपनीचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, स्पर्धेच्या मार्गावर खोदकामामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी भूमिगत सेवावाहिन्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत आणि परस्पर समन्वयातून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या कामांमुळे स्पर्धेसोबतच पुणेकर नागरिकांनाही अधिक सुरक्षित, गुळगुळीत आणि सुशोभित रस्ते उपलब्ध होणार आहेत.
