अलिबागमधील आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप
कातकरी आदिवासी कुटुंबांची घरे जेसीबीने पाडल्याचा गंभीर दावा ;राहुल नार्वेकरांविरोधात संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
2 મિનિટ વાંચન

मुंबई / अलिबाग, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी अलिबाग तालुक्यात जमीन खरेदीचा सपाटा लावला असून, त्यातून गरीब आदिवासींच्या जमिनीही लाटल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील आदिवासी कुटुंबांची घरे बेकायदेशीररीत्या पाडून त्यांना विस्थापित करण्यात आल्याचा दावा करत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.
15 एकर जमीन खरेदीनंतर एजंटामार्फत घरे व बोअरवेल उखडून पुरावे नष्ट केल्याचा आरोप; २० कुटुंबे विस्थापित
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील कातकरी आदिवासी वाडीत पिढ्यान्पिढ्या राहणाऱ्या सुमारे 20 आदिवासी कुटुंबांची घरे २४ मार्च २०२४ रोजी व त्यानंतरच्या दिवसांत बेकायदेशीररीत्या तोडून त्यांना जबरदस्तीने विस्थापित करण्यात आले. सदर जमीन (गट क्रमांक १४८/१, क्षेत्र १५ एकर) फेब्रुवारी २०२४ मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांच्या नावे खरेदी केल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.
जमिनीवर आदिवासींची घरे असल्याचे लक्षात आल्यानंतर नार्वेकर यांचे एजंट दशरथ पाटील यांनी मोठ्या जमावासह येऊन कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने घरे पाडली, घरातील सामान मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले आणि बोअरवेलदेखील उखडून टाकत पुरावे नष्ट केले, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
२०१७ च्या शासन निर्णयानुसार ही कुटुंबे जमिनीचे मालक; तक्रार घेण्याऐवजी दमदाटी करून अंगठे घेतल्याचा दावा
राऊत यांनी पत्रात स्पष्ट केले की, महाराष्ट्र शासनाने ४ जानेवारी २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही कुटुंबे त्यांच्या घराखालील जमिनीचे मालक असून, तशी नोंद अलिबाग तहसीलदारांच्या सर्वेक्षण रेकॉर्डमध्ये आहे. या कुटुंबांकडे गेल्या १५ ते २० वर्षांपासूनच्या घरपट्टीच्या पावत्या आहेत आणि शासकीय योजनेतून मिळालेली घरेही या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
पोलीस व महसूल यंत्रणेवर टीका करताना राऊत म्हणाले की, आदिवासी कुटुंबांनी वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न करता धमकी देऊन त्यांच्याकडून 'आम्ही हक्क सांगणार नाही' असे लिहून घेतले व न वाचता अंगठे घेतले. सध्या ही विस्थापित कुटुंबे पर्यायी जागेत पिण्याचे पाणी, वीज आणि रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांविना अत्यंत दयनीय अवस्थेत जगत आहेत.
संजय राऊत यांच्या पत्रातील प्रमुख मागण्या
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
एजंट दशरथ पाटील तसेच या कृत्यात सहभागी असलेल्या अन्य संबंधित व्यक्तींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ऍट्रॉसिटी ऍक्ट) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा.
विस्थापित झालेल्या सर्व आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आणि हे प्रकार विधानसभा अध्यक्षांच्या दबावाखाली घडत असल्यास राहुल नार्वेकर यांना त्यांच्या पदावरून तात्काळ दूर करावे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
