अजित पवारांच्या मृत्यूचे सत्य समोर आलेच पाहिजे; दत्ता भरणेंची मागणी
रोहित पवारांच्या आरोपांनंतर राष्ट्रवादीतील नेत्याची प्रतिक्रिया; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत पुन्हा भेट घेणार
2 મિનિટ વાંચન

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गंभीर आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही याप्रकरणी प्रतिक्रिया समोर आली आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी अजित पवार यांच्या मृत्यूचे सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी ठाम मागणी केली आहे. तपासाला होणाऱ्या विलंबामुळे लोकांच्या मनात संभ्रम वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी सोमवारी 'मफलर मॅन'चा उल्लेख करत विमान अपघात प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघाताला इतका काळ उलटूनही साधा गुन्हादेखील दाखल झालेला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
दरम्यान, दत्ता भरणे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, अजित पवार यांच्या मृत्यूचे सत्य समोर आले पाहिजे. तपासाला जितका उशीर होत आहे, तितका लोकांच्या मनातील संभ्रम वाढत आहे. यापूर्वीही या विषयावर चर्चा झाली असून, आम्ही पुन्हा एकदा सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणाचा अहवाल लवकर सादर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचेही भरणे यांनी सांगितले.
रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला
रोहित पवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भरणे यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना टोला लगावला. कोणाच्या लग्नाला कोण गेले किंवा कोणी मफलर घातला, यावरून वेगवेगळे अर्थ काढणे योग्य नाही, असे ते म्हणाले. बारामती विमानतळाच्या विकासाबाबत अजित पवार असतानाच चर्चा झाली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. आता सरकारने निधी मंजूर केला असून विमानतळाचे काम केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे संबंध कसे होते, हे मी स्वतः पाहिले आहे, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.
१० लाख शेतकरी मदतीपासून वंचित
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीबाबतही भरणे यांनी माहिती दिली. पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीपासून राज्यातील सुमारे १० लाख शेतकरी वंचित राहिले आहेत. काही शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, तर काही ठिकाणी सामायिक शेती असल्याने मदत मिळण्यात अडचणी आल्या आहेत. या शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदत पोहोचवली जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मतदान प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचे आवाहन
मतदानाच्या मुद्द्यावर बोलताना भरणे यांनी एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था ठेवण्याचे आवाहन केले. कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तीची शेती गावी असल्यास मतदानाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. स्थानिक पातळीवर कोणीही राजकारण करू नये. जे सत्य आहे ते सत्य आणि जे चुकीचे आहे ते चुकीचे, हे स्पष्टपणे समोर आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

મહારાષ્ટ્ર મિરર
