अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळासाठी ६४.५३ कोटींचा निधी मंजूर; सुप्रिया सुळे भावुक
रात्रीच्या विमान लँडिंगसह सर्व हवामानात उड्डाणांसाठी सुविधा उभारणार; ‘हा निधी आधीच मिळाला असता तर कदाचित दादा आज आपल्यात असते’
1 મિનિટ વાંચન

बारामती : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर तब्बल दहा महिन्यांनी बारामती विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारने ६४.५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून विमानतळावर रात्रीच्या वेळी तसेच विविध हवामान परिस्थितीत विमाने उतरवण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, ‘देर आये दुरुस्त आये; हा निधी आधीच मिळाला असता तर कदाचित दादा आज आपल्यात असते,’ अशा भावनिक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. विमानतळावर अग्निशमन यंत्रणा, धावपट्टीचे सपाटीकरण, प्रकाशयोजना, नेव्हिगेशन सुविधा, एटीसी टॉवर आणि संरक्षक भिंत यांसारखी कामे केली जाणार आहेत. तसेच धावपट्टीचे डांबरीकरण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्थाही उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ लिअरजेट ४५ हे विमान कोसळून झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली.
विमानतळाच्या दैनंदिन कामकाजासाठी आणि देखभालीसाठी सरकारने वार्षिक ६८.८८ लाख रुपयांच्या आवर्ती खर्चालाही मंजुरी दिली आहे. यामधून २१ कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे बारामती विमानतळाच्या पायाभूत सुविधांसह सुरक्षा आणि व्यवस्थापनात सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
