Govandi Shifa Sheikh Murder : गोवंडीतील शिफा शेख हत्या प्रकरणाचा 24 तासांत छडा! प्रेमप्रकरणातून झाली हत्या; शिवाजीनगर पोलिसांकडून 4 आरोपींना बेड्या

•चेंबूर परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपींना झडप घालून पकडले; मुलीच्या गालावर गोळी झाडून करण्यात आला होता खून
मुंबई | मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात 10 फेब्रुवारी रोजी सकाळी एका 19 वर्षीय तरुणीचा, शिफा शेख हिचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. मात्र, शिवाजीनगर पोलिसांनी कौशल्याने तपास करत या गुन्ह्यातील सर्वच्या सर्व चारही आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
नेमकी घटना काय?
10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास बैंगणवाडी येथील फुरकानिया रोडवर शिफा शेख ही तरुणी रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळली होती. तिला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शिफाच्या डाव्या गालावर अग्निशस्त्राने (बंदुकीने) गोळी मारल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी शिफाच्या वडिलांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाची चक्रे आणि थरारक अटक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त समीर शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली. तपासात हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपी चेंबूर परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची तांत्रिक माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शिफाची हत्या केल्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यात मदत करणाऱ्या आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या दोघांनाही बेड्या ठोकल्या.
पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे, पोलीस निरीक्षक पाटील, पवार आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. 24 तासांच्या आत आरोपींना अटक केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या आरोपींनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र कोठून आणले आणि यामागे आणखी काही कारस्थान आहे का, याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.



