Goregaon Crime News : ‘तडीपार’ गुन्हेगार पुन्हा गोरेगावमध्ये सक्रिय! रिक्षाचालकाचा मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

•बांगुरनगर पोलिसांची 24 तासांत कारवाई;20 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसह साथीदाराला अटक
मुंबई (गोरेगाव ) :- गोरेगाव पश्चिम भागात रिक्षाचालकांना लक्ष्य करून मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीचा बांगुरनगर पोलिसांनी 24 तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेला एक आरोपी सराईत असून, त्याला मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतानाही तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.
रिक्षाचालक मनोज कुमार सोमर साव (वय 44) यांचा भगतसिंगनगर 2 नाका परिसरातून मोबाईल चोरीस गेला होता. दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या रिक्षाच्या स्टेरिंगवर ठेवलेला ₹ 6 हजार किंमतीचा मोबाईल नजर चुकवून चोरला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासणीच्या आधारे आरोपींचा माग घेतला.
पोलिसांनी गोरेगाव परिसरातून प्रथम सोहेल उमर फारुख खान (वय 26) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान साथीदार संदिप नंदु मोहिते (वय 36) याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. संदिप मोहिते याला सापळा रचून अटक करण्यात आली. या सखोल तपासानंतर संदिप मोहिते याच्याकडून आणखी एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी चोरीस गेलेले दोन मोबाईल (एकूण किंमत 11 हजार) हस्तगत करून बांगुरनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अटक आरोपी संदिप नंदु मोहिते हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्यावर 20 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.पोलीस उप-आयुक्तांनी त्याला एक वर्षाकरिता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही तो पुन्हा गोरेगाव परिसरात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मीना कुमार, पोलीस उप-आयुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशफाक शेख आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने अथक प्रयत्नांनी केली आहे. आरोपींची पोलीस कोठडी प्राप्त झाली असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे



