CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांच्या प्रदर्शानाच्या कार्यक्रमांचं उद्घाटन पार पडलं
सातारा :- छत्रपती शिवाजी महाराज Chatrapati Shivaji Maharaj संग्रहालय येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्याच्या खासदार छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत, हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडण्याची संधी ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी मुघल सत्तेला पराभूत करुन रयतेचे राज्य स्थापन केले. स्वराज्यावर चालून आलेले संकट अफजलखानाचा वध करताना त्यांनी ज्या वाघनखाचा उपयोग केला ती वाघनखे अनेक वर्ष लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली होती. ती वाघनखे साताऱ्यात संग्रहालयामध्ये शिवप्रेमींच्या दर्शनासाठी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडण्याची संधी मिळाली आहे. शिवरायांनी जातीभेद न करता रयतेचे राज्य प्रस्थापित केले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील व्यक्ती ही वाघनखे पाहण्यासाठी येईल व त्यातून प्रेरणा घेईल. छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करत असून राज्यात अनेक विकासात्मक प्रकल्प, योजना सुरु आहेत. शेवटच्या घटकाचा विचार करत प्रत्येकाच्या उत्थानासाठी शासन काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजी महाराज बलीदान स्थळाच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी ; उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवीन पिढीला इतिहास कळावा, यासाठी शिवछत्रपतींची वाघनखे प्रेरणादायी आहेत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याचे सांगून यापुढेही विकासकामांच्या प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राजगडच्या पायथ्याशी मौजे पाल ता. वेल्हा येथील राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आराखड्याला 30 कोटींचा निधी, वडजल ता. जुन्नर येथील शिवनेरी संग्रहालयाला 300 कोटी, मौजे तुळापूर हवेली येथील छत्रपती संभाजी महाराज बलीदान स्थळाच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शिराळा सांगली येथे स्मारक, प्रतागपडच्या पायथ्याशी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी जागा निवडण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर शिवराज्यभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. शिवनेरीच्या विकासासाठी देखील आराखडा तयार करुन निधी देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री सरदार मोलोजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या इंदापूर ऐतिहासिक गढीच्या संवर्धनासाठी 40 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.
शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन, संवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या वेल्हा तालुक्याचे नाव आता राजगड करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रतापगड, रायगड, शिवनेरी, याबाबतच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही. तरुण किल्ल्यांवर मद्यपान करता याबाबत अधिक कायदा कडक करण्यात येणार आहे.