Skip to content

शिक्रापुरात सराफ दुकानात महिलांनी केली हातसफाई

दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी स्त्रियांनी सव्वा लाखांचे मंगळसूत्र चोरले

PG
Prashik Ghaste

1 min read

शिक्रापुरात सराफ दुकानात महिलांनी केली हातसफाई

दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी स्त्रियांनी सव्वा लाखांचे मंगळसूत्र चोरले

पुणे: शिक्रापूर येथील एका सराफ दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी १ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र शिताफीने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (ता. २१) दुपारी अडीचच्या सुमारास शिक्रापूर गावच्या हद्दीतील ‘बाबा ज्वेलर्स’ या सराफ दुकानात ही घटना घडली.

याप्रकरणी संतोष रामराज तिवारी (वय ४७, रा. तळेगाव रोड, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिवारी यांचे शिक्रापूरमध्ये ‘बाबा ज्वेलर्स’ नावाचे सराफ दुकान आहे. मंगळवारी दुपारी दोन अनोळखी महिला ग्राहक म्हणून त्यांच्या दुकानात आल्या होत्या. यावेळी त्यांनी तिवारी यांना दागिने दाखवण्यास सांगितले. दागिने पाहण्याच्या बहाण्याने या महिलांनी तिवारी यांची नजर चुकवून ९ ग्रॅम १२० मिलि वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले.

महिला दुकानबाहेर पडल्यानंतर काही वेळाने मालाची मोजदाद करताना मंगळसूत्र गायब असल्याचे तिवारी यांच्या लक्षात आले. दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली असता, या महिलांनी मंगळसूत्र लंपास केल्याचे दिसून आले. चोरीला गेलेल्या या मंगळसूत्राची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत १ लाख ३० हजार रुपये आहे.

शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवाल्दार हाडागळे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलांचा शोध घेतला जात आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सराफ दुकानात अशा प्रकारे चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Women sanitized their hands at a jewelry shop in Shikrapur

Share