Skip to content

केशवनगर येथील प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याने शहरात कचऱ्याची समस्या

महापालिका अधिकाऱ्यांचा खुलासा

PG
Prashik Ghaste

2 min read

केशवनगर येथील प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याने शहरात कचऱ्याची समस्या

महापालिका अधिकाऱ्यांचा खुलासा

शहरातील सर्वच भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेत प्रशासनाला धारेवर धरले

निलेश राऊत
पुणे: मागील सात ते आठ दिवसांपासून शहरातील सर्वच भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून ठराविक ठेकेदारांसाठी कृत्रिम समस्या निर्माण केल्याचा आरोप नगरसेवकांनी मुख्यसभेत केला. यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केशवनगरमधील दोन प्रकल्प बंद असून इतर दोन प्रकल्प अपुर्ण क्षमतेने कार्यरत असल्याने कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा खुलासा केला आहे. ही समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासनही दिले आहे.

शहरातील सर्वच भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेत प्रशासनाला धारेवर धरले. विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सभा तहकुब झाल्याने प्रशासनाचा खुलासा होऊ शकला नाही.

मुख्य सभेनंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची भेट घेउन कचरा समस्येबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले, केशवनगर येथील १५० टन क्षमतेचे दोन प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. तसेच रामटेकडी आणि सूस येथील दोन प्रकल्प अपूर्ण क्षमतेने चालतात, त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे. सध्या शहरात निर्माण होणाऱ्या अकराशे टन ओल्या कचर्यापैकी फक्त ४०० टन कचर्यावर प्रक्रिया होते. उर्वरीत ७०० टन कचरा शेतीसाठी देण्यात येतो.

घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारूळे म्हणाले, मागील काही काळात सातत्याने वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे देखिल काही प्रकल्पांमध्ये प्रक्रियेचे काम खंडीत होउन कचरा समस्या निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. बंद असलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत कचरा समस्या कमी करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अतिरिक्त कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. लवकरात लवकर कचऱ्याची समस्या कमी करण्यात येईल.

प्रशासन काळातही कचऱ्याची समस्या होती ….
महापालिकेत चार वर्ष प्रशासक राज होते, त्यावेळीही शहरात कचऱ्याची समस्या होती. मात्र लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने त्याची चर्चा होत नव्हती, कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळत होता. आता लोकनियुक्त नगरसेवक आल्याने ही समस्या सर्वांसमोर येत आहे. यात नवीन काहीच नाही, अशी प्रतिक्रीया घनकचरा व्यवस्थापन विभागातील एका वरीष्ठ महिला अधिकाऱ्याने दिली आहे.

पुणे न्युज

Share